Saturday, July 27, 2013

नात तुझ नि माझं

Friendship
 नात तुझ नि माझं ,अतिशय जिव्हाळ्याच 
दूर असूनही मनानी जवळ राहायचं 
कळत नकळत एकमेकांसाठी झुरायचं 
तरीही प्रत्येक यशात आणि अपयशात 
एकमेकाला सावरायचं ,
मनातल्या जपलेल्या क्षणांना ओठावर 
येऊ नाही द्यायचं 
फक्त त्यांना मनोमन आठवून 
आनंदाने बहरून जायचं 
कोणतीही अपेक्षा, कोणतीही आशा न 
ठेवता , एकमेकांसाठी देवा कडे मागणं 
मागायचं 
कुठेही असलो तरी मैत्री साठी 
सर्वस्व पणाला लावायचं !!
--क्षमा 

दुनियादारी

Duniyadari
"दुनियादारी "-- सध्या प्रत्येक  मराठी माणसाच्या तोंडावर वारंवर येणारा शब्द !
आत्ताच प्रदर्शित झालेल्या या "महाविद्यालयीन काळातील दुनियादारी" दाखवलेल्या 
 चित्रपटा मुळे हा शब्द फारच प्रसिद्ध झाला . परंतु माझ्या मते या शब्दाचं मूळ हे 
प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे. मग तो मराठी माणूस गिरगावातील 
चाळीत राहणारा किंवा डोंबिवली किंवा पुण्यात राहणारा असो / गणपतीत गणेशोत्सव साजरा 
करण्या करिता एकत्र येणारा असो/होळी साठी एक महिना आधी पासून साहित्य गोळा 
(चोरणारा ) असो.   शेजारच्या घरात आजारी पडणार्याची चौकशी  करण्या पासून 
शेजार्यांची काळजी घेणारा असो.  किंवा 
सोसायटीत कुणाच कनेक्शन कुणाशी यावर लक्ष ठेवणारा असो . आपल्या मुलां प्रमाणे 
शेजार्यांच्या मुलांवरही शिस्त लागावी म्हणून रागावणारा असो किंवा सणासुदीला एक 
मेकांना गोड धोड घरी नेवून देणारा असो .  शेजारी लग्न कार्य असेल तर आपल्या घरातच 
सण  समारंभ असावा त्याप्रमाणे शेजार्यांच्या पाहुण्यांची सरबराई करणारा असो .  
मराठी माणसाच्या रक्तातील हा गुण आहे असं म्हणायला हरकत नाही . या मुळेच 
एकेकाळी मराठी समाज एक आदर्श समाज म्हणून ओळखला जात होता आणि 
आपल्यातील ऐक्य टिकून आहे . आज अशी दुनियादरी टिकवणण्या साठी आपण आपल्या 
परीने काय प्रयत्न करत आहोत याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. अशी 
दुनियादारी टीकवण्याकरिता आणि आपल्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वाना या साठी प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही काय कराल?

Wednesday, July 24, 2013

विरक्ती


"मी सगळ्यातून विरक्ती घेतली आहे" असं बर्याच माणसांकडून ऐकायला मिळतं . पण खरच 
असं म्हणणारी माणसं  विरक्त असतात का? आसक्ती चा नाश म्हणजे विरक्ती पण 
अशी विरक्ती जर सक्ती ने घेतलेली असेल तर त्याला खर्या अर्थाने विरक्ती म्हणता येणार नाही . 

  सक्तीची विरक्ती म्हणजे 
"ज्या गोष्टी आपल्याला सहज उपलब्ध होणार नाहीत किंवा 
 या पुढे आपण त्या साध्य करू शकणार नाही किंवा 
ज्या गोष्टींवरचा आपला ताबा नाहीसा होतो आहे आणि तो परत 
मिळणार नाही याची जाणीव झाल्यावर त्या गोष्टी टाळणे पण 
मनातून असे झाल्याचे दुखः करत राहणे"

अशा सक्तीच्या विरक्तीने मनःशांती मिळणार तर नाहीच परंतु मनाची व्याकुळता जास्तच 
वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा सक्तीच्या विरक्ती पासून शक्यतो स्वतःला दूर ठेवण्याचा 
प्रयत्न करावा . त्या ऐवजी योग्य विचाराने आणि आचरणाने विरक्ती मिळवण्याचा प्रयत्न करावा . 
हे सहज शक्य नसले तरी सराव केल्याने सहज साध्य होण्या सारखे आहे.  
या साठी समाधानी वृत्ती ठेवणे जास्त महत्वाचे आहे .  खोटा अहंकार, स्पर्धा , तुलना या गोष्टी 
दूर ठेवणे गरजेचे आहे . आपण प्राप्त परिस्थितीत ज्या भूमिकेत आहोत ती योग्य तर्हेने पार 
पडण्यासाठी जो त्याग , कष्ट करावे लागतील ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी आणि 
कर्तव्ये निष्ठेने आणि कसोशीने पार पाडावीत . असे केल्याने मनःशांती तर मिळेलच परंतु 
मन विरक्तीच्या दिशेनेहि सहजतेने वळवता येइल.