Monday, November 18, 2013

शनि महात्म्य


मला आवडलेले मराठीतील 80
ओव्यांचे शनि महात्म्य इथे देत आहे.  वाचायला सोपे
आणि लवकर पाठ होईल असे स्तोस्त्र आहे. ज्यांना मोठे शनि महात्म्य वाचणे
शक्य नसेल त्यांनी जरूर वाचा !



श्री गणेशाय नमः

उज्जयनी या नगरमध्ये जो विक्रम राजा
न्याय नीतीने राज्य करी तो आनंदी हि प्रजा

अशाच एके समयी त्याने पंडित पाचारुनी
ग्रहश्रेष्ठ तो कोण असे? मज सांगावे ज्ञानी

रवि ग्रहाची पूजा करिता विघ्ने ती पळती
आधिव्याधि नि दरिद्र दु:खे त्या स्मरता शमती

सोमाची ती ताकद भारी पोषी वनराजी
शंभूच्या तो भाळी विलसे नच कोणा गांजी

मंगळ ग्रह तो क्रूर परंतु पुजकास मानी
दु :खे निरसुनि  वाचवी दीना द्रव्या देउनी

बुध ग्रहाचा प्रताप मोठा सर्व ग्रह माजी
विघ्ने पळती मुळापासुनी जो मोदे पूजी

गुरु ग्रहाची फार थोरवी प्रिय पूजकासी
शुक्राचे ते पूजन करिता भाव दु:खे नाशी


पंडितांनी सर्व ग्रहांची तारीफ ती कथुनी
शनिदेवाचे वर्णन करता रायाचे कानी

शब्दची पडले शनि देवाची दृष्टी पितयावर
पडता भरले क्षणात त्याच्या कुष्ठची अंगावर

सारथी होता तोही झाला क्षणात पांगुळा
अश्वाचे ते डोळे जाऊन झाला घोटाळा

वाक्य ऐकुनी नृपतीने त्या टाळी वाजवली
शनि देवाची हसून त्याने टवाळीच केली

त्याच वेळी विमानातुनी जाता शनिराजा
खाली उतरले पाहता विनये कर जोडी राजा

हात जोडूनी शनिदेवाला वदला तो नृपती
तुम्हा निंदिले क्षमस्व न धरा राग मजवरती

बोल ऐकुनी शानिश्वराना राग बहु आला
बारावा मी आलो आता कन्या राशीला

चमत्कार हा तुला दाखवीन क्षणात एका मी
रूप पालटूनी शनिदेव आले कथा असे नामी

वारू विकाया आणले त्यांनी उज्जयनी नगरा
अबलख वारुवरी बैसला विक्रम राव खरा

टाच मारीता  वारू गेला जैसा कि वारा
दाट वनी  त्या नृपतीने धरला कि आसरा

वारू गुप्त तो होता नृपती निद्रिस्तचि झाला
प्रभात होता तामालीन्द्पूर या नगरा गेला

तामालीन्द्पूर नगरामध्ये  वैश्याची तनया
मोहित झाली विवाह करण्या पाहुनी तो राया 

हेतू आपुला कथुनी मुलीने बाबांच्या कानी 
द्यावे धाडुनी अतिथीला त्या इच्छा-वर म्हणुनी 

आज्ञे परी तो अतिथी गेला पुत्रीच्या महाली 
मध्यरात्रीला आरती घेउनि आली ती बाळी 

शनिदेवाच्या मायेने तो निद्रीस्ताची झाला 
मान वळवूनी पाहीना तो वैश्य कन्यकेला 

भिंतीवरच्या चित्रामधल्या निर्जीव हंसाने 
खुंटीवरचा मौक्तिक हारची गिळला प्रेमाने 

राती सौख्य ते नसे लाभले वैश्य कन्यकेला 
चोरी करुनी अतिथिने त्या हर पहा नेला 

वैश्याने मग अतिथीला त्या नेले बांधुनिया 
राया करवी हात पाय ते दिधले तोडूनिया 

कर-चरणाविन दीन कष्टला राया तो भारी 
उज्जायनीची तेलीण चाले तमालिंद नगरी 

तिने पहिले नीजनृपतीला दया बहु आली 
तेल-घाणीवर नेते यांना विनंती हळू केली 

सदय होऊनी दिली मान्यता चंद्रसेनानी 
तेलीणिची विनयशील ती विनंती ऐकुनी 

घाण्यावरती नृपतीने तो दीप राग म्हणता 
दीप उजळले नगरामध्ये ते हा हा म्हणता 

राग ऐकुनी पद्मावती ती प्रसन्न मनी झाली 
विवाह करण्या विक्रमासवे ती उत्सुक झाली 

इतुक्या अवसरी शनिदेव ते आले त्या स्थानी 
पाद- हस्त  अन दिव्य तेज ते दिधले तोषोनी 

शनिदेव ते प्रसन्न झाले राव विक्रमाला 
इच्छावर तो मागून घेण्या सांगितले त्याला 

भूपति बोले गांजू  नको तू मनुष्यप्राण्याला 
हीच विनंती मनापासुनी केली देवाला 

वाक्य ऐकुनी राजाचे श्री शनिदेव वादती 
परपीडेच्या   कष्टाची तुज जाण असे पुरती 

विक्रमासी हास्यविनोदे शनिदेव वदले 
दानव देवा छळले भारी, तुज थोडे छळले 

देव दैत्य ते कसे गांजिले श्रवण करी राया 
प्रातः काळी  वाकून केले नमनचि गुरुराया 

हात जोडूनी विनंती केली श्रीगुरुनाथाला 
साडेसात वर्षे येतो तुमच्या राशीला 

शानिदेवाचे बोल ऐकुनी गुरुदेव म्हणती 
साडेसात वर्षे येत होईल दीन स्थिती 

सव्वा प्रहरचि यावे म्हणुनी सांगितले गुरुनी 
बोल गुरुचे मान्यचि केले श्री शानिदेवानी 

वाक्य ऐकुनी गुरुदेवांनी विचार मनी केला 
स्नान संध्यादि कर्मामध्ये दवडीन हि वेळा 

स्नान करुनी गंध लावूनी दिसता गुरुराजे 
फकीर वेषे येउनि शनिने दिधली खरबुजे 

तीच खरबुजे पंचामध्ये बांधुनी श्रीगुरूनी 
रस्ता धरला नगराचा झणी मोठ्या हर्षानी 

त्या नगरीचे राजपुत्र अन प्रधानपुत्र वनी 
शिकारीस ते गेले होते दो घोडयावरुनी 

प्रहर झाला तरी नाच आले म्हणुनी रायानी 
धुंडायासी सैन्य धाडिले बघ रानोरानी 

सैन्य निघाले तोच पहिला विप्र एक त्यांनी 
झोळी होती हाती त्याच्या घेतली काढोनी 

झोळी बघता त्यात निघाले शिरकमळे दोन्ही 
प्रधान राजपुत्राची ती घेतली काढोनी 

शिरकमळे ती विप्रासहितचि राजाच्या महाली 
विप्र कृती ती यथासांग मग त्याला ऐकवली 

राजाने मग आज्ञा केली द्यावे सुळी याला 
म्हणुनी सेवके लोखंडाचा सूळ उभा केला 

विप्राला त्या घेउनि जाता नगराबाहेरी 
विनंती केली देऊ नका सुळी सव्वा प्रहर तरी 

विप्राला त्या घेउनि जाता विप्र काय बोले 
अपराधी मी नसे मुळी मज शनिने गांजीयले 

एक प्रहर मज वाट बघुनी द्यावे झणि फाशी 
म्हणुनी लागला विप्र सविनये सेवक-चरणाशी 

विप्रवचन ते श्रवण करुनी राज्यासेवकांनी 
मान्यची केले बोल तयाचे मोठ्या प्रेमानी 

हा हा म्हणता सव्वा प्रहरचि निघोनिया जाता 
राजपुत्र अन प्रधानपुत्रही आले अवचीता 

त्यांना पाहुनी रायाने मग विप्र पाचारुनी 
द्रव्य देऊनी सोडविले त्या वंदनही करुनी 

शनिदेवाच्या मायेने मी कष्ट दिले फार 
म्हणुनि लोळला तोच नृपती गुरुचे पायावर 

झोळी काढुनी पाहता ती खर्बुजेच होती 
शिरकमळांची लुप्त जाहली क्षणात आकृती 

शानिदेवानी नमन करुनी श्री गुरुदेवाना 
प्रश्नचि केला कशा भोगिल्या दारूण त्या यातना 

गुरु बोलले शनिदेवा तू ग्रहात श्रेष्ठ खरा 
सव्वा प्रहारामध्ये  माझा केला मातेरा 

सत्वर जाऊनी  शनिदेव ते शंभू चरणासी 
जाऊन वदले येतो स्वामी तुमच्या मी राशि 

बोल ऐकुनी शंभूराजा लपला कैलासी 
काय आपुले केले वदले श्रीशानिदेवासी 

धाक त्रिभुवनी असता तुमचा कैलासी लपला 
प्रताप माझा पाहुनी तुम्ही भयभितचि झाला 

आला जेव्हा शनिग्रह तो दशरथ-पुत्राला 
चौदा वर्षे दारूण त्याने वनवास भोगियला 

तसाच येता श्रीशानिराजा सीतामाईला 
लंकेशाने कपात करुनी नेले लंकेला 

बारावा तो आला जेव्हा लंकाधीशाला 
सरळचि  झाले नवग्रहचि तो  मुकला प्राणाला 

बारावा तो आला जेव्हा हरिश्चंद्र राया 
डोंबा घरी तो कुमार विकला तशीच ती जाया 

कपटाने ती पहा भोगिली गौतमाची जाया 
पापाने इंद्राची झाली रूपहीन काया 

नळराजाची  प्रिय पत्नी जी दमयंती मानी 
विरह करविला प्रेमाचा त्या ताटातूट करुनी 

गुरुपत्नीसी कपटे धरता कलंक चंद्राला 
वसिष्ठासी तो येता  गेले सुत-शत स्वर्गाला 

पंडूसुतांना  पीडा होता वनवासी झाले 
श्रीकृष्णाला स्यमंतकाचे लांछनही लागले 

विक्रमाला पाहुनी वदला वैश्य दीन वाणी 
अज्ञानाने केली तुमची छळणूक रायानी 

एक देश तो राये दिधला मोदे वैश्याला 
वैश्याने हि कन्या अर्पुनी दुवाच जोडीयला 

चित्रीच्या त्या हंसाने जो हर पहा गिळला 
तसाच त्याने पहा पुनरपि मोदे उगळीला 

हार  उगळीता विस्मय वाटे साऱ्या जनतेला 
हात जोडूनी वंदन करिती श्री शनि देवाला 

प्रेमाने त्या विक्रम न्रुपतिसि चंद्रसेन वदला 
आपण कुठले ? वंश कोणता ? सांगा हो मजला 

प्रश्न ऐकता विक्रम बोले काय चंद्रसेना 
विक्रम माझे नाव असे मी उज्जैनीचा राजा 

चंद्रासेनाने आपली कन्या मोदे देवोनी 
त्या राजसी सख्य जोडले भाक्तीप्रेमानी 

राजाची त्या शनि-प्रसादे साडेसाती गेली 
राव पाहुनी उज्जैनीची प्रजा सुखी झाली 

श्री शनि-प्रभूचे वर्णन केले शनिश्वरा नमुनी 
शब्दही सोपे भाषा सुंदर मांडीयली कविनी 

नित्य प्रभाती व शनिवारी करी पठण त्याला 
देव शनि तो देईल द्रव्या कीर्ती वैभवाला 

वर्षे साडेसात शनीची पीडा ज्या होते 
प्रसन्नचि मने वाचन करिता दैन्य लया जाते 

सप्रेमे हि काव्य मालिका पुष्पकांतांनी 
नम्रत्वाने अर्पण केली मातेच्या चरणी