Friday, May 29, 2015

कहाणी लंडन च्या आजीबाई ची ~~~ राधाबाई ची

एका बेफाम जिद्दीची गोष्ट.
१९४८/४९ .
राधाबाई,
यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला.

एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते हि ऐन हिवाळ्यात.
बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर हि अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. हि म्हणाली "स्वयंपाक". त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.
..........आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
पु ल, अत्रे, यान पासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.
त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा मेयर हजर होता.
........ आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.

आज नाश्ता काय ?




नाश्त्याला काय करायचं, मला वाटतं हा प्रश्न चिरंतन आहे. माझ्याकडे माझ्या मदतीला जी मुलगी आहे ती माझ्याकडे सोळा वर्षं आहे. ती रोज मला स्वयंपाक करताना बघते पण तरीही तिचा रोजचा प्रश्न असतो की, ताई, नाश्त्याची काय तयारी करू? एरवी ठीक आहे पण कधीकधी कामात असताना असा प्रश्न आला की चिडचिड होते. मग मी तिला म्हणते की अगं आपण काय हॉटेलात राहतो का? तेच ते पदार्थ तर करतो, कर तुझ्या मनानं काहीही. परत थोड्या वेळानं ती येते आणि परत तोच प्रश्न. परवा असंच झालं मग तिला म्हटलं जरा थांब, सांगते तुला. आणि तिरीमिरीत एका डायरीत नाश्त्याला काय काय करतो हे लिहून काढलं, एकच पदार्थ वेगवेगळ्या पध्दतीनं कसा करता येतो हेही लिहिलं. आज मी तुमच्यासाठी तीच यादी शेअर करणार आहे.
उपमा –
१) कॉर्न उपमा, मटार उपमा, गाजर-फ्लॉवर घालून केलेला उपमा,
२) साधा उपमा – आलं-मिरची वाटून, फोडणीला उडदाची डाळ-कढीपत्ता घाला, साखर-मीठ घाला. वर ओलं खोबरं, कोथिंबीर घाला.
३) सांजा – गव्हाचा रवा (दुकानात रेडीमेड मिळतो (दलिया) ) भाजून घ्या. फोडणीला सुकी लाल मिरची, उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ आणि कढीपत्ता घाला. नेहमीच्या उपम्यासारखा करा.
पोहे –
१) कांदे पोहे २) बटाटे पोहे ३) मटार पोहे
४) बारीक चिरलेला फ्लॉवर आणि गाजर घालून केलेले पोहे
५) दडपे पोहे, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून केलेले पोहे
इडली –
१) इडली, सांबार, चटणी,
२) कांचीपुरम इडली – इडलीच्या पिठात भिजवलेली चणा डाळ, काजुचे तुकडे, किसलेलं आलं, ओलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जाडसर भरडलेली मिरपूड घाला. इडली पात्राला तूप लावून इडल्या करा. उत्तम लागतात.
३) मिश्र भाज्या घालून केलेली इडली – फ्लॉवर-गाजर बारीक चिरा, त्यात मटार दाणे घाला, आलं-मिरची वाटून घाला, कोथिंबीर घाला, इडल्या करा.
पराठे –
१) मेथी पराठे – बारीक चिरलेली मेथी, वाटलेला लसूण, जिरे पूड, तिखट, मीठ, हळद, तीळ, थोडंसं दही, आवडत असल्यास एखादं पिकलेलं केळं कुस्करून घाला. कणीक घाला. सगळं एकत्र करा. पोळ्यांसारखी कणीक भिजवा. पराठे करा. तेल लावून खमंग भाजा.
२) पालक पराठे – पालक, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात जिरे पूड, तिखट, मीठ, कणीक घाला. पराठे करा. तेल लावून भाजा.
३) फ्लॉवर पराठे – फ्लॉवर किसून घ्या. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. धणे-जिरे पूड, तिखट, मीठ, आमचूर, चिमूटभर गरम मसाला घाला. दोन पोळ्या लाटून मध्ये हे सारण भरा. कडा नीट बंद करा. हलकं लाटा. तूप लावून खुसखुशीत भाजा.
४) मुळ्याचे पराठे – मुळे जाड किसा. १० मिनिटं पंचावर टाकून ठेवा. पंचात घट्ट गुंडाळून पिळून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घाला. धणे-जिरे पूड घाला, तिखट, मीठ, आमचूर घाला. दोन पोळ्या लाटून सारण भरा. मस्त तूप लावून भाजा.

५) आलू पराठे – उकडलेले बटाटे कुस्करा. आलं-लसूण-मिरची वाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, धणे-जिरे पूड, आमचूर घाला. पुरणाप्रमाणे भरून पराठे करा. तूप/तेल लावून भाजा.
६) कोबीचे पराठे – कोबी किसा, हळद, तिखट, मीठ, जिरे पूड घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, कणीक घालून भिजवा. पराठे करा. तेल लावून भाजा. याच पध्दतीनं दुधीचे पराठेही करता येतात.
७) जि-या-मि-याचे पराठे – जिरं भाजून जाडसर पूड करा, मिरे भरड वाटा, कणकेत घाला, तुपाचं मोहन घाला, मीठ घाला. पीठ घट्ट भिजवा. जाडसर पराठे लाटा. तूप लावून भाजा.
आप्पे –
१)चणाडाळ, उडीद डाळ, तांडूळ भिजवून पीठ तयार करा. त्यात आलं-लसूण मिरची वाटून घाला. कोथिंबीर घाला. आप्पेपात्रात आप्पे करा.
२) दोशाचं किंवा इडलीचं उरलेलं पीठ असेल तर त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. आप्पे करा.
उपासाचं थालिपीठ –
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, उपासाची भाजणी, दाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं-मिरची-जिरं-साखर वाटून तो ठेचा, तिखट, मीठ घाला. तूप लावून थालिपीठं करा.
साबुदाणा खिचडी –
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, दाण्याचं कूट, साखर, मीठ, आलं-मिरची वाटून, कोथिंबीर, लिंबाचा रस सगळं एकत्र करून तूप जि-याच्या फोडणीवर खिचडी करा.
डोसा –
डोसा, चटणी, भाजी, सांबार, चटणी
उत्तपा –
डोशाच्या पिठात बारीक चिरलेलं कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो घाला. तव्यावर जाडसर उत्तपे घाला. किंवा या भाज्या कोशिंबिरीसारख्या एकत्र करा. जाडसर डोसा घालून त्यावर भाज्या घाला. उलथन्यानं दाबा. झाकण घालून उत्तपे करा.
लाह्याचे पिठाचे मुटके
ज्वारीच्या लाह्यांचं पीठ, भरपूर दाण्याचं कूट, जरा जास्त हिंग, हळद, तिखट, मीठ, बारीक कोथिंबीर, आंबट दही. हे एकत्र करा. हाताच्या मुठीनं दाबून मुटके करा. जरा जास्त तेलावर शॅलो फ्राय करा.
फोडणीचं लाह्याचं पीठ –
वर दिलेलं साहित्य एकत्र करा. थोडं पाणी घालून सरबरीत भिजवा. जरा जास्त तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करा. त्यात कालवलेलं पीठ ओता. मंद आचेवर वाफ येऊ द्या.
दूध-साखर-लाह्याचं पीठ एकत्र कालवून खा. किंवा ताकात कालवा, जिरे पूड-कोथिंबीर घालून खा.
नाचणीचा डोसा –
नाचणीचं पीठ, उडदाची भिजवलेली डाळ वाटून त्यात मिसळा. रात्रभर आंबवा. त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. नेहमीसारखे डोसे करा.
मिक्स डाळींची धिरडी किंवा अडाई –
चणा, उडीद, मूग, तूर डाळी, तांदूळ समप्रमाणात घ्या. रात्रभर भिजवा. सकाळी वाटताना त्यात धणे-सुकी लाल मिरची घाला. मीठ घाला, बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. धिरडी करा.
याच पिठाचे आप्पेही करता येतील
मुगाची धिरडी –
भिजवलेले मूग वाटा. त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. मीठ-जिरेपूड घाला, किसलेलं आलं घाला. तांदळाचं पीठ घाला. धिरडी करा.
ऑम्लेट –
१) नेहमीसारखं कांदा-मिरची-कोथिंबीर घालून करा.
२) या ऑम्लेटवर किसलेलं चीज घाला.
३) बारीक स्लाईस केलेले मश्रूम, बारीक चिरलेला ब्रॉकोली घाला
३) कधी नुसतं कांदा-टोमॅटो मीठ मिरपूड-चीज घाला.
बरोबर पराठ्यांसारख्या पोळ्या किंवा ब्रेड द्या.
फोडणीची पोळी-भात-ब्रेड
मिक्स पिठांची धिरडी –
कणीक, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी, बाजरीचं पीठ यापैकी आवडीची कुठलीही पिठं घ्या. आपल्याला आवडेल ते प्रमाण घ्या.
१) पालक चिरून, लसूण-मिरची-जिरं वाटून घाला. तिखट, मीठ, हळद घालून सरबरीत पीठ भिजवा. धिरडी करा.
२) टोमॅटो,जिरं, लसूण, मिरची वाटून, तिखट, मीठ, हळद घाला, पीठ भिजवून धिरडी करा.
३) बारीक चिरलेली किंवा किसलेली कुठलीही भाजी (दुधी, गाजर, मेथी इत्यादी) घाला, तीळ, तिखट-मीठ घाला.
तांदळाचं पीठ-बेसन धिरडी
तांदळाचं पीठ आणि बेसन समप्रमाणात घ्या. ताकात भिजवा. लसूण-मिरची जिरं वाटून घाला.
This is for all women.in family who have problem....
आज नाश्ता काय ?

Tuesday, May 19, 2015

लज्जतदार जेवण


सगळ्यात उत्तम एटी केट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत.
सूप,बासुंदी,रस याच्या वाट्या तोंडाला लावा व्यात आणि घोटा घोटाने संपवाव्यात.
ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडा पासून वाटी अलग करू नये.आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरम गरम कालवावा.ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभातआणि दहीभात यांचीही एकच कृती.जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा रहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास,केरल इथे बदली होऊ शकते.
रसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करूनखाणाऱ्या मंडळीचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल हि भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.जिलबी मात्र मठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.श्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधा सारखे जिभेला लावायचे असते.पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुला सारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड,बासुंदी,आमरस हि मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.
मिठाच्या डावी कडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्याचा आणि सुरांचा जीव घेतत्याचा प्रवास सुरु असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि महिफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात.
पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.पापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारेआहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.हल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात.बटाटावड्याच एवढ बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटा वडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का ? भजी मात्र चालतात.
स्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे. साधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्या बद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले कि हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील हि शंका मनात पिंगा घालायला लागते .
चिवड्याला चमचा नको पण या यज्ञ कर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे .
हि पाच बोटे हि पंच महाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्व. जेवताना हि पंच महाभूत जेवणात उतरायला हवीत.
राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली



Note :लेख  Whats appवरून प्राप्त झाला आहे