Thursday, March 6, 2014

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy International Women's Day
कार्येषु दासी , कारणेषु  मंत्री ,भोजेषु माता , शयनेषु रंभा
रूपेषु लक्ष्मी , क्षमायेषु धरित्री ,शत धर्म युक्ता ,कुल धर्म पत्नी

अशा प्रकारे तन , वाणी आणि मनाने जी पूर्ण पणे समर्पित आयुष्य जगते अश्या त्या स्त्रीच्या गौरवाचा आजचा दिवस .

जागतिक महिला दिन !!!!!!!

दासी सारखे काम करणारी , मंत्री किंवा  प्रसंगी योग्य सल्ला देणारी सल्लागार , आई च्या प्रेमाने
जेवू घालणारी , अप्सरे प्रमाणे सुख देणारी , लक्ष्मि सारखी सुंदर , पृथ्वी इतका संयम बाळगणारी आणि क्षमाशील अशा
सहा भूमिका प्रत्येक स्त्री आपल्या कुवती प्रमाणे निभावण्याचा सतत प्रयत्न करत असते .  आणि यामुळेच स्त्रीशक्तीच
महत्व टिकून आहे . बदलत्या काळा प्रमाणे आज तिला तिची जीवन शैली जरी बदलावी लागत असली ,तरी तिच्यातील
स्त्रीत्वाचे गुण परोपरीने जपण्याचा तिचा प्रयत्न किंवा लढा  हा सतत सुरु असतो .  नवीन युगात योग्य अयोग्याचे भान ठेवण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो आणि यात तिची तारेवरची कसरत सुरु असते .

आपण सहजच विचार केला तर आपल्या अस लक्षात येईल कि  शंभर वर्षांपूर्वी भारतीय स्त्री ची दिनचर्या व आजच्या भारतीय स्त्री ची दिनचर्या आणि तिच्या जबाबदार्या ह्यात विलक्षण अंतर आहे .  विश्लेषणच करायचं झालं तर

शंभर वर्षांपूर्वी स्त्रीची दिनचर्या

पहाटे उठणे ,आन्हिक आवरणे  ,देवघरात दिवा लावणे ,सडा रांगोळी , देवपूजेची तयारी ,दळण , कांडण , पाणी भरणे ,जमीन , चूल सारवणे ,सोवळ्यातील स्वयंपाक (चुलीवर )(काहींना गाय गुरांसाठी चारा आणि गोठ्याची कामे करावी लागत असत तर काही ठिकाणी शेतीची कामेही केली जात ),घरातील लहान मुले ,वृद्ध यांची काळजी घेणे योग्य वेळी घरातील जेवणखाण उरकणे ,(प्रसंगी घरातील कुलधर्म कुलाचार योग्य रीतीने पार पाडणे ) इत्यादी , सायंकाळी त्या स्त्रीचा दिवस संपत असे.


आजच्या स्त्रीची दिनचर्या (सर्वसाधारण ८०% स्त्रिया आज नोकरी व्यावासायाकरता बाहेर पडत असतात हे गृहीत धरून लिहित आहे )

पहाटे उठणे , आन्हिक आवरणे , आपल्या कुटुंबाच्या डब्यांसाठी जेवण तयार करणे , मुल लहान असेल तर त्याच्याबरोबर  पाळणाघरात द्यायच्या
वस्तूंची तयारी करणे किंवा मुलाला शाळेत जायला तयार करणे , स्वताची तयारी करणे  आणि वेळेवर कार्यालयात हजर होण्यासाठी बाहेर पडणे . संध्याकाळी थकून घरी आल्यावर पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करणे , टिव्ही  वर आवडीच्या मालिका पाहणे , मुलांचा अभ्यास घेणे .
या सर्वात जमेल तसे स्त्री वेळो वेळी येणारे सण , समारंभ योग्य रीतीने साजरे करण्याचा आणि नातेवाईकांप्रती आपली कर्तव्ये पार पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करते . काही वेळा संयुक्त कुटुंब असेल तर घरात मोठी माणसे असतात पण पुष्कळ विभक्त कुटुंबात हीच दिनचर्या पहावयास मिळते .

आता या दोन्हीची तुलना केली तर तुम्हाला काय वाटत, खर्या अर्थाने उत्तम आयुष्य कोणती स्त्री जगली?

खरतर याच उत्तर फार अवघड आहे पण त्याही पेक्षा अवघड आहेत ते प्रश्न जे बदललेल्या जीवनशैली मुळे या ८० टक्के स्त्रियांना सामोरे जावे लागत आहेत . मग ते त्यांच्या स्वास्थ्या संबंधी असतील , नात्यांसंबंधी असतील , त्यांच्या मातृत्वासंबंधी असतील किंवा अन्य .

आज जागतिक महिला दिन साजरा करताना एकाच गोष्टीची  खंत वाटते कि स्त्री संबंधी असणाऱ्या समस्यांचं स्वरूप बदलत आहे , तीची आर्थिक बाजू जरी बळकट होत असली तरी मानसिक आणि शारीरिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत . अशा समस्यांवर मात  करण्यासाठी तिला कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याची आवश्यकता आहे .  फार कमी स्त्रियांना असा आधार मिळतो परंतु बर्याच अंशी स्त्रिया त्यापासून वंचित राहतात .  खर्या अर्थाने तुमच्या घरातील स्त्री चा आदर वाटत असेल तर आज पासून तिच्या मागे खंबीर पणे उभे राहा ! तुमच्या सहकार्याने तुम्ही तिचे आयुष्य व आपले आयुष्य आनंदी ठेवू शकता .

No comments:

Post a Comment