Sunday, April 3, 2016

चैत्रांगण : सुंदर रांगोळी

चैत्रांगण : सुंदर रांगोळी
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते.
 लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.
अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.
गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.
अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते.