Saturday, March 8, 2014

हरिहर किल्ला


फोटो आणि माहिती सौजन्य : टी राजू लक्ष्मण 
हरिहर किल्ला


पाय-या नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आलेला इंग्रज अधिकारिही या पाय-यांच्या प्रेमात पडला....म्हणून या आज आपणास दिसत आहेत. 
पहिला दरवाजा दिसतोय त्याच्यापलिकडेही डोळ्याचे पारणे फेडणा-या पाय-या आहेत. जीवनात हां थरार आपण एकदा तरी अनुभवाच.....!!!
इगतपुरी -घोटीपासून जवळच आहे हां किल्ला...!!

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरकिल्ला व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.



३) कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४) इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

फोटो आणि माहिती सौजन्य : टी राजू लक्ष्मण 

Thursday, March 6, 2014

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy International Women's Day
कार्येषु दासी , कारणेषु  मंत्री ,भोजेषु माता , शयनेषु रंभा
रूपेषु लक्ष्मी , क्षमायेषु धरित्री ,शत धर्म युक्ता ,कुल धर्म पत्नी

अशा प्रकारे तन , वाणी आणि मनाने जी पूर्ण पणे समर्पित आयुष्य जगते अश्या त्या स्त्रीच्या गौरवाचा आजचा दिवस .

जागतिक महिला दिन !!!!!!!

दासी सारखे काम करणारी , मंत्री किंवा  प्रसंगी योग्य सल्ला देणारी सल्लागार , आई च्या प्रेमाने
जेवू घालणारी , अप्सरे प्रमाणे सुख देणारी , लक्ष्मि सारखी सुंदर , पृथ्वी इतका संयम बाळगणारी आणि क्षमाशील अशा
सहा भूमिका प्रत्येक स्त्री आपल्या कुवती प्रमाणे निभावण्याचा सतत प्रयत्न करत असते .  आणि यामुळेच स्त्रीशक्तीच
महत्व टिकून आहे . बदलत्या काळा प्रमाणे आज तिला तिची जीवन शैली जरी बदलावी लागत असली ,तरी तिच्यातील
स्त्रीत्वाचे गुण परोपरीने जपण्याचा तिचा प्रयत्न किंवा लढा  हा सतत सुरु असतो .  नवीन युगात योग्य अयोग्याचे भान ठेवण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो आणि यात तिची तारेवरची कसरत सुरु असते .

आपण सहजच विचार केला तर आपल्या अस लक्षात येईल कि  शंभर वर्षांपूर्वी भारतीय स्त्री ची दिनचर्या व आजच्या भारतीय स्त्री ची दिनचर्या आणि तिच्या जबाबदार्या ह्यात विलक्षण अंतर आहे .  विश्लेषणच करायचं झालं तर

शंभर वर्षांपूर्वी स्त्रीची दिनचर्या

पहाटे उठणे ,आन्हिक आवरणे  ,देवघरात दिवा लावणे ,सडा रांगोळी , देवपूजेची तयारी ,दळण , कांडण , पाणी भरणे ,जमीन , चूल सारवणे ,सोवळ्यातील स्वयंपाक (चुलीवर )(काहींना गाय गुरांसाठी चारा आणि गोठ्याची कामे करावी लागत असत तर काही ठिकाणी शेतीची कामेही केली जात ),घरातील लहान मुले ,वृद्ध यांची काळजी घेणे योग्य वेळी घरातील जेवणखाण उरकणे ,(प्रसंगी घरातील कुलधर्म कुलाचार योग्य रीतीने पार पाडणे ) इत्यादी , सायंकाळी त्या स्त्रीचा दिवस संपत असे.


आजच्या स्त्रीची दिनचर्या (सर्वसाधारण ८०% स्त्रिया आज नोकरी व्यावासायाकरता बाहेर पडत असतात हे गृहीत धरून लिहित आहे )

पहाटे उठणे , आन्हिक आवरणे , आपल्या कुटुंबाच्या डब्यांसाठी जेवण तयार करणे , मुल लहान असेल तर त्याच्याबरोबर  पाळणाघरात द्यायच्या
वस्तूंची तयारी करणे किंवा मुलाला शाळेत जायला तयार करणे , स्वताची तयारी करणे  आणि वेळेवर कार्यालयात हजर होण्यासाठी बाहेर पडणे . संध्याकाळी थकून घरी आल्यावर पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करणे , टिव्ही  वर आवडीच्या मालिका पाहणे , मुलांचा अभ्यास घेणे .
या सर्वात जमेल तसे स्त्री वेळो वेळी येणारे सण , समारंभ योग्य रीतीने साजरे करण्याचा आणि नातेवाईकांप्रती आपली कर्तव्ये पार पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करते . काही वेळा संयुक्त कुटुंब असेल तर घरात मोठी माणसे असतात पण पुष्कळ विभक्त कुटुंबात हीच दिनचर्या पहावयास मिळते .

आता या दोन्हीची तुलना केली तर तुम्हाला काय वाटत, खर्या अर्थाने उत्तम आयुष्य कोणती स्त्री जगली?

खरतर याच उत्तर फार अवघड आहे पण त्याही पेक्षा अवघड आहेत ते प्रश्न जे बदललेल्या जीवनशैली मुळे या ८० टक्के स्त्रियांना सामोरे जावे लागत आहेत . मग ते त्यांच्या स्वास्थ्या संबंधी असतील , नात्यांसंबंधी असतील , त्यांच्या मातृत्वासंबंधी असतील किंवा अन्य .

आज जागतिक महिला दिन साजरा करताना एकाच गोष्टीची  खंत वाटते कि स्त्री संबंधी असणाऱ्या समस्यांचं स्वरूप बदलत आहे , तीची आर्थिक बाजू जरी बळकट होत असली तरी मानसिक आणि शारीरिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत . अशा समस्यांवर मात  करण्यासाठी तिला कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याची आवश्यकता आहे .  फार कमी स्त्रियांना असा आधार मिळतो परंतु बर्याच अंशी स्त्रिया त्यापासून वंचित राहतात .  खर्या अर्थाने तुमच्या घरातील स्त्री चा आदर वाटत असेल तर आज पासून तिच्या मागे खंबीर पणे उभे राहा ! तुमच्या सहकार्याने तुम्ही तिचे आयुष्य व आपले आयुष्य आनंदी ठेवू शकता .

Thursday, February 27, 2014

सुगरण

सुगरण हा शब्द उच्चारला कि दोन गोष्टींची आठवण येते ,

Sugaran
एक म्हणजे कलाकुसर आणि मेहनतीने आपला घर विणणारा सुगरण पक्षी आणि
दुसरी म्हणजे उत्तम आणि चविष्ट स्वयंपाक करणारी घरातली स्त्री ! मग ती कोणीही असेल
आपली आई /ताई /वाहिनी/सासूबाई किंवा तुम्ही स्वतः हि :)

खरतर सुगरण आणि स्त्री हे एकमेकाला पूरक शब्द आहेत . ती स्त्री आहे म्हणजे ती सुगरण असलीच पाहिजे असा पूर्वीच्या काळी एक अलिखित नियमच असे . परंतु आता या सुगरणींच्या यादीत आणखी एका स्त्री ची भर पडली आहे ती म्हणजे घरात स्वयंपाक करायला येणारी बाई (स्त्री ) . हल्ली घरातील स्त्री हि सुगरण असेलच किंवा असावी या बद्दल काही ठरलेली मते नाहीत . विशेषतः उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या समाजात या गोष्टीला फारसे महत्व दिले जात नाही .  अशा घरांमध्ये स्वयंपाकाला येणारी स्त्री हीच सुगरणीची भूमिका निभावत असते आणि सर्व जण तिने शिजवलेल्या अन्नाच कौतुक करत रोज जेवताना दिसतात . आणि तिचं  मन दुखावल गेलं तर ती यायची बंद होईल अशी भीतीही कुठेतरी मनात दडलेली असतेच .
घरातील स्त्री नोकरी/व्यवसाया  निम्मित्त दिवसाचे बरेच तास बाहेर असल्यामुळे अशा सुगारिणीना भलतेच महत्व प्राप्त झाले आहे .

खर म्हणजे आज मी या विषयावर लिहिण्याच मुख्य कारण फारच वेगळं आणि चिंताजनक आहे .  आज काल घरात एक किंवा दोन मुल असतात .
त्यात ते मुलगे असतील तर स्वयंपाक या विषयात त्यांच्या कडून  अपेक्षा केली जात नाही आणि त्यांनी काही मदत केलीच तर त्याचे कौतुकही केले जाते . परंतु त्या मुली असतील तर आज काल एक वेगळच चित्र पाहायला मिळत . ती मुलगी आहे कधीतरी सासरी जाणार आहे आणि तिला त्या घरात काम कराव लागेलच या कल्पनेने आज कालच्या  स्त्रिया आपल्या मुलींना घरात काम करू देत नाहीत किंवा त्यांच्या कडून फारशी अपेक्षा हि करत नाहीत .
हे योग्य का अयोग्य याचा निर्णय जाने त्यानेच घ्यायचा आहे परंतु या संदर्भात मला आलेला अनुभव फारच विचित्र आहे .

कार्यालयात काम करताना सतत आपण नवीन सह कर्मचार्यांच्या संपर्कात येत असतो . एकत्र काम करता करता मैत्री वाढते आणि मग एकत्र चहापान , लंच घेऊ लगतो. अशीच एक नवीन मैत्रीण काही दिवसांपूर्वी आमच्या लंच ग्रुप मध्ये सामील झाली .  हास्य विनोद, नवीन पद्धतीने केलेल्या रोजच्या जेवणा बद्दलच्या चर्चा , एकमेकांच्या पाक कला कौशल्याचे कौतुक ह्या सर्व लंच घेताना घडणाऱ्या नेहमीच्याच गोष्टी !  या नवीन मैत्रिणी बरोबर सुरवातीला लंच घेताना आम्हा सर्वाना फारच चांगला अनुभव आला . ती हि आमच्याच सारखे रोजचे जेवण घरून आणत असे आणि सर्वांबरोबर शेयर करत असे परंतु काही दिवसांनी आमच्या अस लक्षात आलं कि तीने आणलेला लंच हा तिने केलेला नसून तो आदल्या रात्री तिच्या स्वयंपाकीण बाईनी केलेला असतो . ती फक्त दुसर्या दिवशी तो बरोबर आणत असे . तिने असे करण्या मागचे कारण विचारातच असे लक्षात आले कि तिला स्वयंपाकाची अजिबात सवय नाही आणि आता शिकायची फारशी आवड आणि इच्छाही नाही .  काही दिवसांनी तिच्या स्वयंपाकीण बाईनी नोकरी सोडली आणि नवीन बाई मिळाल्या नाहीत . तिने लंच हॉटेल मधून मागवायला सुरवात केली . पण तिने शेयर केलेलं ते हॉटेल च अन्न रोज खाण आम्हाला मान्य नव्हत . बरेच दिवस असेच निघून गेले तरीही तिला स्वयंपाकाला बाई मिळाल्या नाही आणि तिची घरचे अन्न खाण्याची ओढ वाढत गेली . पुढे काही दिवसांनी सतत हॉटेल चे जेवण जेवून तब्बेत बिघडू लागली आणि खर्च हि वाढू लागला . आणि ती आमच्या कडून तिच्या साठी लंच आणण्याची अपेक्षा करू लागली . हि गोष्ट लक्षात येताच स्पष्ट शब्दात तिला बर्याच गोष्टी समजावाव्या लागल्या .
घरी शिजवलेलं   अन्न हे शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीनेयोग्य  आहे आणि सर्व वयोगटातील माणसांची ती मुळ  गरज आहे . त्यामुळे घरातील स्त्री म्हणून तुला स्वयंपाक करता येण हि गरजेची गोष्ट आहे . स्वयंपाकीण बाई हि पर्यायी सोय आहे आणि जरूर असेल तेव्हा आणि शक्य असेल तेव्हा त्यांची मदत घेतलीच पाहिजे परंतु स्वयंपाक येतच नाही म्हणून हा पर्याय योग्य नाही . स्त्री आपल्या नोकरी / व्यवसायात कितीही व्यस्त असली तरी तिला चविष्ट स्वयंपाक करता येण हि अपरिहार्य गोष्ट आहे आणि तिच्या सवडी आणि आवडी प्रमाणे तिने त्यात सुधारणा करणे हे तिचे कर्तव्य आहे. स्त्री पुढच्या पिढीला जन्म देत असते, संस्कार करत असते आणि तिने शिजवलेल्या अन्नातून तिच्या मुलांवर होणारे संस्कार इतर कोणत्याही अन्नातून होणार नाहीत .  आपण स्वतःच स्वयंपाक करू शकलो नाही तर आपल्या मुलांना कौतुकाने त्यांच्या आवडीचे पदार्थ करून घालणारी आई तुम्ही कुठून आणणार?

हे सर्व वाचणार्या प्रत्येक आई ला माझी कळकळीची विनंती आहे , आपल्या मुलीला स्वयंपाक जरूर शिकावा . तिला स्वयंपूर्ण बनवा . तुमच्या चुकीच्या लाडाने तुम्ही केवळ तिच्या भावी घराचेच नव्हे तर नकळत पूर्ण समाजाचे नुकसान करत आहात .

Tuesday, January 14, 2014

तिळगुळ घ्या आणि गोड बोला

Happy Makar Sankrant!
सर्व प्रथम मकर संक्रांतीच्या सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा !
नात्यातील ओढ टिकवून ठेवतो तो तिळगुळ ….
आणि सर्वाना एकत्र आणतो तो सण मकर संक्रांत
जेव्हा  खर्या अर्थाने आपण अनुभवतो तिळाचा स्नेह आणि  गुळाची गोडी

मकर संक्रांतिच्या दिवसा  पासून रथसप्तमी पर्यंत हा संक्रांत सण साजरा करण्याची आपल्या कडे
प्रथा आहे. उत्साहाने  सुवासिनी घरोघरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करत असतात . रोजच्या
व्यस्त जीवनातून स्त्रियांना एकमेकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारत , तिळगुळाचा आनंद सहज
लुटता यावा या साठी अशी परंपरा असावी . या हळदी कुंकवाच वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी
सुवासिनी हळदी कुंकू आणि तिळगुळा सोबतच आपल्याला जमेल आणि रुचेल अशी कोणतीही
वस्तू लुटू शकते ( वाटू शकते). कदाचित एक स्त्रीच इतर स्त्रियांच्या भावना   आणि गरजा समजू
शकत असेल असा दृढ विश्वास आपल्या पूर्वजांना असल्या मुळे हे प्रचलित झाले असावे असे वाटते .

या सर्व गोष्टींचा मेळ माझ्या मते एकाच उक्तीशी जुळून येतो ती म्हणजे "वसुधैव कुटुम्बकम"!
एक स्त्री म्हणून इतर स्त्रियांचा आदर करणे , एकमेकांच्या गरजा समजून घेणे आणि प्रेमाने
एकत्र येउन एकमेकांना मानसिक आणि आत्मिक आनंद देणे हा या हळदी कुंकू समारंभाचा
मुख्य उद्देश आहे .

अशाच भावनेतून आणि संकल्प करून या वर्षीचा संक्रांत सण साजरा करताना मला  अविस्मरणीय  आनंदाचा अनुभव आला . काल १४ जानेवारी २०१४ रोजी भिनारी च्या आदिवासी पाड्यात जाऊन केलेल्या
हळदी कुंकू समारंभातून अशा प्रेमाचा सहज आनंद घेता आला .  आमचे फेसबुक मित्र श्री .  श्रीरंग
आठल्ये आणि त्यांच्या पत्नी सौ. संध्या ताई , या दांपत्या मुळे आदिवासी पाड्यात त्यांच्या घरी
जाऊन त्यांच्या सोबत हा सण साजरा करण्याचा योग आला .  तिथे जमलेल्या  सर्व भगिनींची ओटी भरून , बच्चे कंपनीला खाऊ वाटून आणि त्यांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही घरी परतलो . त्या भगिनींच्या चेहऱ्या वरील आनंद एक वेगळे समाधान देऊन गेला

अशा गोष्टी करताना जस मित्र मैत्रिणींच सहकार्य लागत तसच घरातून मिळणारा पाठींबा फार महत्वाचा
असतो .  मुंबई पासून भिनारी ला एकटीने जाणे शक्य नव्हते पण माझे पती गणेश बडे यांच्या कडून  सतत
मिळणारे प्रोत्साहन  माझा भाऊ (श्री जयंत गोंधळेकर) आणि वाहिनी (सौ मानसी ) यांचे प्रेम या मुळे हे
तडीस नेणे शक्य झाले .
Wahini :Manasi, Sandhya tai aani Shrirang Athalye, Bhau: Jayant Gondhalekar 

 आपल्या अवती भवति असलेल्या समाजाचे ऋण कधीही न फिटणारे असते . पण आपल्या मनात  या
समाजासाठी काही करण्याची भावना जर खरी असेल तर सहकार्य करण्यासाठी बरेच हात पुढे येतात आणि
आपण एकटे पडत नाही याची जाणीव खर्या अर्थाने मला या संक्रांत सणाने करून दिली .

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

Saturday, December 7, 2013

नारळ-आंबा वडी




साहित्य:
अर्धी वाटी आटवलेला आंब्याचा रस ,
खोवलेला नारळ : एक  ,
चार वाट्या साखर ,
एक वाटी दुध
एक चमचा वेलची पूड

कृती :
प्रथम कढई गरम करावी . खोवलेला नारळ , आटवलेला आंब्याचा रस आणि साखर
 कढई मध्ये एकत्र घालावे .  एक वाटी दुध घालावे . सर्व मिश्रण ढवळत राहावे .
साधारण पंधरा मिनिटांनी कढई च्या कडेला साखर साखत असल्या सारखे दिसू
लागले आणि मिश्रण ढवळताना चमचा अवघड वाटू लागला कि एका ताटाला
तूप लावून घ्यावे आणि त्या मिश्रणाचा गोळा ताटावर ओतावा . एका जाडसर  प्लास्टीक
च्या पिशवीला तूप लावून , तूप लावलेला भाग त्या गोळ्यावर ठेवावा आणि लाटण्याने
गोल पसरून घ्यावा . पसरलेले मिश्रण गरम असतानाच वड्या  कापाव्या

लहान मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी किंवा नैवेद्याला अशा वड्या नक्की करून पाहता येतील

Monday, November 18, 2013

शनि महात्म्य


मला आवडलेले मराठीतील 80
ओव्यांचे शनि महात्म्य इथे देत आहे.  वाचायला सोपे
आणि लवकर पाठ होईल असे स्तोस्त्र आहे. ज्यांना मोठे शनि महात्म्य वाचणे
शक्य नसेल त्यांनी जरूर वाचा !



श्री गणेशाय नमः

उज्जयनी या नगरमध्ये जो विक्रम राजा
न्याय नीतीने राज्य करी तो आनंदी हि प्रजा

अशाच एके समयी त्याने पंडित पाचारुनी
ग्रहश्रेष्ठ तो कोण असे? मज सांगावे ज्ञानी

रवि ग्रहाची पूजा करिता विघ्ने ती पळती
आधिव्याधि नि दरिद्र दु:खे त्या स्मरता शमती

सोमाची ती ताकद भारी पोषी वनराजी
शंभूच्या तो भाळी विलसे नच कोणा गांजी

मंगळ ग्रह तो क्रूर परंतु पुजकास मानी
दु :खे निरसुनि  वाचवी दीना द्रव्या देउनी

बुध ग्रहाचा प्रताप मोठा सर्व ग्रह माजी
विघ्ने पळती मुळापासुनी जो मोदे पूजी

गुरु ग्रहाची फार थोरवी प्रिय पूजकासी
शुक्राचे ते पूजन करिता भाव दु:खे नाशी


पंडितांनी सर्व ग्रहांची तारीफ ती कथुनी
शनिदेवाचे वर्णन करता रायाचे कानी

शब्दची पडले शनि देवाची दृष्टी पितयावर
पडता भरले क्षणात त्याच्या कुष्ठची अंगावर

सारथी होता तोही झाला क्षणात पांगुळा
अश्वाचे ते डोळे जाऊन झाला घोटाळा

वाक्य ऐकुनी नृपतीने त्या टाळी वाजवली
शनि देवाची हसून त्याने टवाळीच केली

त्याच वेळी विमानातुनी जाता शनिराजा
खाली उतरले पाहता विनये कर जोडी राजा

हात जोडूनी शनिदेवाला वदला तो नृपती
तुम्हा निंदिले क्षमस्व न धरा राग मजवरती

बोल ऐकुनी शानिश्वराना राग बहु आला
बारावा मी आलो आता कन्या राशीला

चमत्कार हा तुला दाखवीन क्षणात एका मी
रूप पालटूनी शनिदेव आले कथा असे नामी

वारू विकाया आणले त्यांनी उज्जयनी नगरा
अबलख वारुवरी बैसला विक्रम राव खरा

टाच मारीता  वारू गेला जैसा कि वारा
दाट वनी  त्या नृपतीने धरला कि आसरा

वारू गुप्त तो होता नृपती निद्रिस्तचि झाला
प्रभात होता तामालीन्द्पूर या नगरा गेला

तामालीन्द्पूर नगरामध्ये  वैश्याची तनया
मोहित झाली विवाह करण्या पाहुनी तो राया 

हेतू आपुला कथुनी मुलीने बाबांच्या कानी 
द्यावे धाडुनी अतिथीला त्या इच्छा-वर म्हणुनी 

आज्ञे परी तो अतिथी गेला पुत्रीच्या महाली 
मध्यरात्रीला आरती घेउनि आली ती बाळी 

शनिदेवाच्या मायेने तो निद्रीस्ताची झाला 
मान वळवूनी पाहीना तो वैश्य कन्यकेला 

भिंतीवरच्या चित्रामधल्या निर्जीव हंसाने 
खुंटीवरचा मौक्तिक हारची गिळला प्रेमाने 

राती सौख्य ते नसे लाभले वैश्य कन्यकेला 
चोरी करुनी अतिथिने त्या हर पहा नेला 

वैश्याने मग अतिथीला त्या नेले बांधुनिया 
राया करवी हात पाय ते दिधले तोडूनिया 

कर-चरणाविन दीन कष्टला राया तो भारी 
उज्जायनीची तेलीण चाले तमालिंद नगरी 

तिने पहिले नीजनृपतीला दया बहु आली 
तेल-घाणीवर नेते यांना विनंती हळू केली 

सदय होऊनी दिली मान्यता चंद्रसेनानी 
तेलीणिची विनयशील ती विनंती ऐकुनी 

घाण्यावरती नृपतीने तो दीप राग म्हणता 
दीप उजळले नगरामध्ये ते हा हा म्हणता 

राग ऐकुनी पद्मावती ती प्रसन्न मनी झाली 
विवाह करण्या विक्रमासवे ती उत्सुक झाली 

इतुक्या अवसरी शनिदेव ते आले त्या स्थानी 
पाद- हस्त  अन दिव्य तेज ते दिधले तोषोनी 

शनिदेव ते प्रसन्न झाले राव विक्रमाला 
इच्छावर तो मागून घेण्या सांगितले त्याला 

भूपति बोले गांजू  नको तू मनुष्यप्राण्याला 
हीच विनंती मनापासुनी केली देवाला 

वाक्य ऐकुनी राजाचे श्री शनिदेव वादती 
परपीडेच्या   कष्टाची तुज जाण असे पुरती 

विक्रमासी हास्यविनोदे शनिदेव वदले 
दानव देवा छळले भारी, तुज थोडे छळले 

देव दैत्य ते कसे गांजिले श्रवण करी राया 
प्रातः काळी  वाकून केले नमनचि गुरुराया 

हात जोडूनी विनंती केली श्रीगुरुनाथाला 
साडेसात वर्षे येतो तुमच्या राशीला 

शानिदेवाचे बोल ऐकुनी गुरुदेव म्हणती 
साडेसात वर्षे येत होईल दीन स्थिती 

सव्वा प्रहरचि यावे म्हणुनी सांगितले गुरुनी 
बोल गुरुचे मान्यचि केले श्री शानिदेवानी 

वाक्य ऐकुनी गुरुदेवांनी विचार मनी केला 
स्नान संध्यादि कर्मामध्ये दवडीन हि वेळा 

स्नान करुनी गंध लावूनी दिसता गुरुराजे 
फकीर वेषे येउनि शनिने दिधली खरबुजे 

तीच खरबुजे पंचामध्ये बांधुनी श्रीगुरूनी 
रस्ता धरला नगराचा झणी मोठ्या हर्षानी 

त्या नगरीचे राजपुत्र अन प्रधानपुत्र वनी 
शिकारीस ते गेले होते दो घोडयावरुनी 

प्रहर झाला तरी नाच आले म्हणुनी रायानी 
धुंडायासी सैन्य धाडिले बघ रानोरानी 

सैन्य निघाले तोच पहिला विप्र एक त्यांनी 
झोळी होती हाती त्याच्या घेतली काढोनी 

झोळी बघता त्यात निघाले शिरकमळे दोन्ही 
प्रधान राजपुत्राची ती घेतली काढोनी 

शिरकमळे ती विप्रासहितचि राजाच्या महाली 
विप्र कृती ती यथासांग मग त्याला ऐकवली 

राजाने मग आज्ञा केली द्यावे सुळी याला 
म्हणुनी सेवके लोखंडाचा सूळ उभा केला 

विप्राला त्या घेउनि जाता नगराबाहेरी 
विनंती केली देऊ नका सुळी सव्वा प्रहर तरी 

विप्राला त्या घेउनि जाता विप्र काय बोले 
अपराधी मी नसे मुळी मज शनिने गांजीयले 

एक प्रहर मज वाट बघुनी द्यावे झणि फाशी 
म्हणुनी लागला विप्र सविनये सेवक-चरणाशी 

विप्रवचन ते श्रवण करुनी राज्यासेवकांनी 
मान्यची केले बोल तयाचे मोठ्या प्रेमानी 

हा हा म्हणता सव्वा प्रहरचि निघोनिया जाता 
राजपुत्र अन प्रधानपुत्रही आले अवचीता 

त्यांना पाहुनी रायाने मग विप्र पाचारुनी 
द्रव्य देऊनी सोडविले त्या वंदनही करुनी 

शनिदेवाच्या मायेने मी कष्ट दिले फार 
म्हणुनि लोळला तोच नृपती गुरुचे पायावर 

झोळी काढुनी पाहता ती खर्बुजेच होती 
शिरकमळांची लुप्त जाहली क्षणात आकृती 

शानिदेवानी नमन करुनी श्री गुरुदेवाना 
प्रश्नचि केला कशा भोगिल्या दारूण त्या यातना 

गुरु बोलले शनिदेवा तू ग्रहात श्रेष्ठ खरा 
सव्वा प्रहारामध्ये  माझा केला मातेरा 

सत्वर जाऊनी  शनिदेव ते शंभू चरणासी 
जाऊन वदले येतो स्वामी तुमच्या मी राशि 

बोल ऐकुनी शंभूराजा लपला कैलासी 
काय आपुले केले वदले श्रीशानिदेवासी 

धाक त्रिभुवनी असता तुमचा कैलासी लपला 
प्रताप माझा पाहुनी तुम्ही भयभितचि झाला 

आला जेव्हा शनिग्रह तो दशरथ-पुत्राला 
चौदा वर्षे दारूण त्याने वनवास भोगियला 

तसाच येता श्रीशानिराजा सीतामाईला 
लंकेशाने कपात करुनी नेले लंकेला 

बारावा तो आला जेव्हा लंकाधीशाला 
सरळचि  झाले नवग्रहचि तो  मुकला प्राणाला 

बारावा तो आला जेव्हा हरिश्चंद्र राया 
डोंबा घरी तो कुमार विकला तशीच ती जाया 

कपटाने ती पहा भोगिली गौतमाची जाया 
पापाने इंद्राची झाली रूपहीन काया 

नळराजाची  प्रिय पत्नी जी दमयंती मानी 
विरह करविला प्रेमाचा त्या ताटातूट करुनी 

गुरुपत्नीसी कपटे धरता कलंक चंद्राला 
वसिष्ठासी तो येता  गेले सुत-शत स्वर्गाला 

पंडूसुतांना  पीडा होता वनवासी झाले 
श्रीकृष्णाला स्यमंतकाचे लांछनही लागले 

विक्रमाला पाहुनी वदला वैश्य दीन वाणी 
अज्ञानाने केली तुमची छळणूक रायानी 

एक देश तो राये दिधला मोदे वैश्याला 
वैश्याने हि कन्या अर्पुनी दुवाच जोडीयला 

चित्रीच्या त्या हंसाने जो हर पहा गिळला 
तसाच त्याने पहा पुनरपि मोदे उगळीला 

हार  उगळीता विस्मय वाटे साऱ्या जनतेला 
हात जोडूनी वंदन करिती श्री शनि देवाला 

प्रेमाने त्या विक्रम न्रुपतिसि चंद्रसेन वदला 
आपण कुठले ? वंश कोणता ? सांगा हो मजला 

प्रश्न ऐकता विक्रम बोले काय चंद्रसेना 
विक्रम माझे नाव असे मी उज्जैनीचा राजा 

चंद्रासेनाने आपली कन्या मोदे देवोनी 
त्या राजसी सख्य जोडले भाक्तीप्रेमानी 

राजाची त्या शनि-प्रसादे साडेसाती गेली 
राव पाहुनी उज्जैनीची प्रजा सुखी झाली 

श्री शनि-प्रभूचे वर्णन केले शनिश्वरा नमुनी 
शब्दही सोपे भाषा सुंदर मांडीयली कविनी 

नित्य प्रभाती व शनिवारी करी पठण त्याला 
देव शनि तो देईल द्रव्या कीर्ती वैभवाला 

वर्षे साडेसात शनीची पीडा ज्या होते 
प्रसन्नचि मने वाचन करिता दैन्य लया जाते 

सप्रेमे हि काव्य मालिका पुष्पकांतांनी 
नम्रत्वाने अर्पण केली मातेच्या चरणी 









Monday, October 28, 2013

कल्ला

Kalla 


बालपण, मौज,मस्ती,खोड्या, खेळ, भांडणं हे सर्व शब्द एकमेकाशी अगदी निगडीत आहेत. या सर्वांशी
आणखी एका शब्दाचा फार जवळचा संबंध आहे तो म्हणजे निरागस किंवा निष्पाप वृत्ती . कालानुरूप
या बालपणाशी अनेक नवे शब्द जोडले गेले त्यातलाच एक म्हणजे कल्ला ! कालच अशा कल्ल्याचा
एक वेगळा अनुभव मिळाला .

संध्याकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसातून  घरी आले आणि चहा घेत बसले होते . बाहेर अचानक जोरजोरात
किंचाळण्याचा आणि वेगात काहीतरी घडत असल्या सारखा आवाज आला . मी वेध घेऊन आवाजाच्या दिशेने
पाहायला गेले तो पर्यंत रस्ता आधी सारखाच  शांत दिसत होता. मग आवाज आला कुठून?
मी पुन्हा घरात येउन माझा चहा कार्यक्रम सुरु केला . काही वेळाने परत तसाच गलका ऐकू आला . पुन्हा
जाऊन पाहते तर काही मुल व मुली सायकल चालवत जोर-जोरात किंचाळत जाताना दिसली . त्यांच्या
आवाजाने पूर्ण गल्ली हादरून निघत होती पण त्यांना असे करण्यामागचे कारण विचारण्या करिता एकही
मनुष्य पुढे आला नाही .  मी पुन्हा त्यांच्या येण्याची वाट पाहत तिथेच उभी राहिले . थोड्या वेळाने त्या बाल
टोळीचे पुन्हा त्याच थाटात आगमन झाले . मी सरळ रस्त्याच्या मध्ये जाऊन त्यांची सायकल अडवली आणि
त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला .
आधी थोड दरडावूनच त्यांना असं करण्याच कारण विचारलं . मी अडवलेल्या सायाकालीन्व्यातिरिक्त आणखी
पंधरा सायकली मला घाबरून तिथून निघून गेल्या .  कारण विचारल्यावर नेहमी प्रमाणे मुल माफी मागू लागली . थोड्या वेळाने मी त्यांना बाकीच्या सर्व सवंगड्याना  बरोबर घेऊन यायला सांगितले . मला वाटल होत कि मी ओरडेन म्हणून ती घाबरतील आणि येणार नाहीत . पण थोड्याच वेळात ती जवळ जवळ वीस सायकल स्वारांची  टीम मला भेटायला आणि माझी माफी मागायला आली . हे मला फारच अनपेक्षित होते . "तुम्ही सायकल चालवू नका असे माझे अजिबात म्हणणे नाही परंतु ज्या पद्धतीत किंचाळत तुम्ही शांती भंग करीत आहात हे योग्य नाही"हे माझे सांगणे त्यांना मनापासून पटले होते. खरतर आपण यात काही चूक करीत आहोत हे त्यांना कळलेहि नव्हते . आस पास म्हातारी, आजारी माणास, लहान बाळ असतात तेव्हा इतरांना त्रास होईल असा गलका करू नका असे सांगितल्यावर त्यांना खरच वाईट वाटले आणि तसे न करण्याचे त्यांनी कबुल केले .
आपण नेहमी म्हणतो कि आजची पिढी Mature आहे त्यांना सगळ काही फार लवकर कळत … हे काही अंशी सत्यही आहे परंतु आज काल आपणही त्यांना गृहित धरून त्यांच्यातील निरागसतेचा चुकीचा अर्थ तर लावत नाही न याचा शोध घेतला पाहिजे . काल  त्या मुलांना ओरडताना सुरवातीला हि मुले सगळ काही काळत असून , इतरांना मुद्दामून त्रास व्हावा म्हणूनच अस वागत आहेत हे मी कुठेतरी गृहीत धरलं होतं परंतु त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आलं कि ती त्यांची निरागसता होती . किंबहुना मला असं जाणवलं  कि योग्याठीकाणी , योग्यवेळी मोठ्यांनी आम्हाला अयोग्य गोष्टी करताना रोखाव अस त्यानाही
वाटत होतं . यातून एकच गोष्ट जाणवते मुलाचं बालपण योग्यरीतीने जपायचं असेल तर त्यांच्याशी पूर्वग्रह दुषित न होता संवाद साधा .
आधुनिक जगात वावरणाऱ्या या मुलांना टेक्नोलॉजी लवकर कळते परंतु भावना कळायला उशीर होतोय .  हा उशीर टाळायचा असेल तर परिवाराने सातत्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे उत्तम मार्गदर्शक होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे .
आणि  पालकांनी स्वतःला या गोष्टींसाठी सर्वतोपरी तयार करणे आवश्यकच  आहे .

Thursday, October 24, 2013

आली दिवाळी


Happy Diwali 

जमल तर दिवाळी अशी साजरी करून पहा

* विकतची बर्फी / मिठाई आणण्या पेक्षा घरात काजू / नारळ / गाजर /दुधीच्या वड्या करून पहा .
  नकली मावा आणि चांदीच्या वर्खा पासून स्वतःला आणि परिवाराला वाचवा .

* जोरदार आवाजाचे फटाके वाजवण्या पेक्षा फटाक्यांवर होणारा खर्च अनाथ आश्रमात फराळ वाटण्या
करिता करा .

*  रोषणाई करिता विजेचा वापर शक्यतो टाळा .

* मेसेज पाठवण्या पेक्षा किंवा फोन वर दिवाळी शुभेच्छा देण्या पेक्षा आपल्या जवळच्या माणसाना
प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा त्यांना तुमचा वेळ देऊन सणाचा आनंद द्विगुणीत करा

* दिवाळी आणि रांगोळी तसेच मातीचा किल्ला ह्या अविभाज्य गोष्टी आहेत . घरातील छोट्यांना
याचा परिचय करून द्या .

* दिवाळीचे सगळे दिवस,  त्या त्या दिवसाच महत्व अबाधित राखून आणि आपापसातले वाद / भांडण तंटे
विसरून मनापासून साजरे करा

* सणाला आपल्याला कुणी काय दिलं याच मोजमाप करत बसू नका . परंतु तुम्हाला तुमच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते सर्व करा .

Sunday, October 20, 2013

डोहाळे जेवण गीत

मुलाला जन्म देण म्हणजे बाई चा पुनर्जन्म अशी फार पूर्वीची म्हण आहे. गर्भाची चाहूल लागल्या पासून
 स्त्री ला येणारे वेगवेगळे अनुभव आणि दिवस भरत आल्यावर तिचे बाळंतपण उत्तम रीतीने
पार पडावे  या करिता सासर आणि माहेरच्यांनी तिला दिलेला मानसिक, शारीरिक आणि आर्थिक आधार
या सर्वाचा उत्तम पिढी निर्माण होण्यात फार मोठा वाटा असतो .  असाच एक प्रघात म्हणजे डोहाळी जेवण
गर्भवतीला उत्तमोत्तम आवडतील असे पदार्थ खाऊ घालणे , तिच्या आसपास वातावरण प्रसन्न ठेवणे , तिच्या
हौशी पुरवणे , तिला सर्वतोपरी आनंदी ठेवणे हा या मागचा उद्देश आहे .  अशा डोहाळी जेवणाच्या दिवशी
गायले जाणारे गीत म्हणजे डोहाळे गीत .  आज काल या प्रथा आणि त्यासोबत येणारी गीतं फार कमी लोकांना माहिती असतात किंवा त्या पार पडण्याचा उत्साह असला तरी पद्धती माहित नसतात . तुमच्या साठी खास
एका डोहाळे गीताचा विडीओ इथे पोस्ट करत आहे । गीताचा नक्की आनंद घ्या आणि प्रतिक्रिया नक्की  लिहा