Showing posts with label उत्सव. Show all posts
Showing posts with label उत्सव. Show all posts

Wednesday, March 20, 2013

आनंदाचा दिवस

आजचा दिवस खरच माझ्याकरिता उत्साहाचा किंवा उत्सवाचा दिवस आहे म्हटले तरी वावगे होणार नाही. आज आमच्या कार्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन आहे. असे दिवस कर्मचाऱ्यांकरिता वर्षभराच्या कामाचा शीण घालवणारे व नव्याने आपली कर्तव्ये पार पाडण्याकरिता स्फूर्ती देणारे ठरतात. अनेक वर्ष एकाच 
कार्यालयात काम करत असू तर तिथे एका परिवारा प्रमाणेच वागावे लागते.
त्याहूनही जर सह कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल तर एकमेकला सहकार्य करूनच कामे पार पाडावी  लागतात. एकंदरीत असा वार्षिक उत्सव हा एका पारिवारिक कार्यक्रमा इतकाच महत्वाचा असतो. 
मनुष्य सतत काहीना काही शिकण्याची , नव्याने अनुभव घेण्याची इच्छा बाळगत असतो आणि या इच्छेतूनच आणि कृतीतून तो स्वतःचे जीवन घडवत असतो. ज्याप्रमाणे लहान मुलांकरिता त्यांचे पालक, शिक्षक आणि समाज हे त्याच्या सर्वांगीण विकासाचा एक अविभाज्य भाग आहेत , त्या पद्धतीतच माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे कार्यालय, त्याला सहकार्य करणारे सहकर्मचारी , त्याचे कुटुंब यांचा त्याच्या प्रत्येक  यश आणि अपयशात मोठा वाट असतो. त्याचे मानसिक आरोग्य बर्याच अंशी यावर अवलंबून असते. यशाचा , आनंदाचा, उत्साहाचा काही काळही माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकतो , चांगले बदल घडवू शकतो , फक्त हे अनुभवण्यासाठी आयुष्यात लागते, परिश्रम , निष्टा आणि कार्त्याव्याची जोड !

Tuesday, March 19, 2013

उत्सव प्रेमी भारतीय!

Festivals
आपण भारतीय उत्सव प्रेमी माणसे आहोत यात शंका नाही. आणि अशा 
उत्सवांचा आनंद छोट्या/मोठ्या सर्व कार्यक्रमांतून आपण लुटत असतो. 
घरातील सण/समारंभ/धार्मिक कार्यक्रम हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते ठराविक पद्धतीने साजरे होतात. परंतु जेव्हा सामाजिक कार्यक्रमात किंवा कार्यालयीन कार्यक्रमात आपण सहभागी होतो त्यावेळी अशा कार्यक्रमांचा अनुभव प्रत्येक वेळी वेगळाच असतो.  प्रत्येक वेळी विविधता असते, सहभागी होणारी माणसे वेगळी असतात, सतत नाविन्य राखण्यासाठी नवनवीन कल्पना राबवल्या जातात. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी अशा कार्यक्रमांतून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. आपल्या आसपास असणाऱ्या आणि आपण ज्यांना उत्तम ओळखतो अशा माणसांच्यातील सुप्त गुणांची ओळख आपल्याला खर्या अर्थाने अशा कार्यक्रमातून होत असते. काही वेळा असे कार्यक्रम आपल्यालाही आपल्यातील काही गुणांची नव्याने ओळख करून देतात आणि एक अनाहूत आनंद देऊन जातात.अशा गोष्टी करत असताना मिळणारे प्रोत्साहन, शाबासकीची थापही मनुष्याचे आयुष्य बदलू शकते, त्याचा आत्मविश्वास नव्याने वाढवत असते.  तुम्हीही एखाद्या सामाजिक कार्यात योगदान देत असाल किंवा कार्यालयीन कामा व्यतिरिक्त कार्यालयात होणार्या इतर कार्यक्रमात तुमचा सहभाग असेल तर तुम्हाला नक्कीच असे अनुभव वारंवार येत असतील. तुमचे अनुभव प्रतिक्रियेच्या स्वरुपात नक्की सांगा!