Wednesday, March 20, 2013

आनंदाचा दिवस

आजचा दिवस खरच माझ्याकरिता उत्साहाचा किंवा उत्सवाचा दिवस आहे म्हटले तरी वावगे होणार नाही. आज आमच्या कार्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन आहे. असे दिवस कर्मचाऱ्यांकरिता वर्षभराच्या कामाचा शीण घालवणारे व नव्याने आपली कर्तव्ये पार पाडण्याकरिता स्फूर्ती देणारे ठरतात. अनेक वर्ष एकाच 
कार्यालयात काम करत असू तर तिथे एका परिवारा प्रमाणेच वागावे लागते.
त्याहूनही जर सह कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल तर एकमेकला सहकार्य करूनच कामे पार पाडावी  लागतात. एकंदरीत असा वार्षिक उत्सव हा एका पारिवारिक कार्यक्रमा इतकाच महत्वाचा असतो. 
मनुष्य सतत काहीना काही शिकण्याची , नव्याने अनुभव घेण्याची इच्छा बाळगत असतो आणि या इच्छेतूनच आणि कृतीतून तो स्वतःचे जीवन घडवत असतो. ज्याप्रमाणे लहान मुलांकरिता त्यांचे पालक, शिक्षक आणि समाज हे त्याच्या सर्वांगीण विकासाचा एक अविभाज्य भाग आहेत , त्या पद्धतीतच माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे कार्यालय, त्याला सहकार्य करणारे सहकर्मचारी , त्याचे कुटुंब यांचा त्याच्या प्रत्येक  यश आणि अपयशात मोठा वाट असतो. त्याचे मानसिक आरोग्य बर्याच अंशी यावर अवलंबून असते. यशाचा , आनंदाचा, उत्साहाचा काही काळही माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकतो , चांगले बदल घडवू शकतो , फक्त हे अनुभवण्यासाठी आयुष्यात लागते, परिश्रम , निष्टा आणि कार्त्याव्याची जोड !

Tuesday, March 19, 2013

उत्सव प्रेमी भारतीय!

Festivals
आपण भारतीय उत्सव प्रेमी माणसे आहोत यात शंका नाही. आणि अशा 
उत्सवांचा आनंद छोट्या/मोठ्या सर्व कार्यक्रमांतून आपण लुटत असतो. 
घरातील सण/समारंभ/धार्मिक कार्यक्रम हे जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि ते ठराविक पद्धतीने साजरे होतात. परंतु जेव्हा सामाजिक कार्यक्रमात किंवा कार्यालयीन कार्यक्रमात आपण सहभागी होतो त्यावेळी अशा कार्यक्रमांचा अनुभव प्रत्येक वेळी वेगळाच असतो.  प्रत्येक वेळी विविधता असते, सहभागी होणारी माणसे वेगळी असतात, सतत नाविन्य राखण्यासाठी नवनवीन कल्पना राबवल्या जातात. मुख्य म्हणजे प्रत्येक वेळी अशा कार्यक्रमांतून नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. आपल्या आसपास असणाऱ्या आणि आपण ज्यांना उत्तम ओळखतो अशा माणसांच्यातील सुप्त गुणांची ओळख आपल्याला खर्या अर्थाने अशा कार्यक्रमातून होत असते. काही वेळा असे कार्यक्रम आपल्यालाही आपल्यातील काही गुणांची नव्याने ओळख करून देतात आणि एक अनाहूत आनंद देऊन जातात.अशा गोष्टी करत असताना मिळणारे प्रोत्साहन, शाबासकीची थापही मनुष्याचे आयुष्य बदलू शकते, त्याचा आत्मविश्वास नव्याने वाढवत असते.  तुम्हीही एखाद्या सामाजिक कार्यात योगदान देत असाल किंवा कार्यालयीन कामा व्यतिरिक्त कार्यालयात होणार्या इतर कार्यक्रमात तुमचा सहभाग असेल तर तुम्हाला नक्कीच असे अनुभव वारंवार येत असतील. तुमचे अनुभव प्रतिक्रियेच्या स्वरुपात नक्की सांगा!

Sunday, March 17, 2013

दुष्काळ : जबाबदार कोण?

Drought

सकाळी उठल्यावर डोळे उघडल्या उघडल्या आपण 
कराग्रे वसते लक्ष्मि,
कर मध्ये सरस्वती,
करमुले  तू गोविन्दम,
प्रभाते कर दर्शनम!
हि प्रार्थना करतो. आणि अशा 
पवित्र हातानी दिवसभरात योग्य  व पवित्र कर्म घडावे अशी अशा करतो.  
सध्या महाराष्ट्रासह बरीच राज्ये दुष्काळ ग्रस्त आहेत. कमी पाऊस आणि पाण्याचे अयोग्य नियोजन, रखडलेले प्रकल्प किंवा सीमा वाद यात राज्यकर्ते अडकलेले असताना सामान्य माणूस या दुष्काळाचे तडाखे सोसत आहे. गावाच्या गावं सोडून आपल्या कुटुंबांसह लोकांना स्थलांतर करावं लागत आहे. अनेक कुटुंबांचे जीवन अस्थिर झाले आहे आणि भविष्य अंधारात आहे. कदाचित त्यांना काही दिवस आर्थिक मदत मिळेलही परंतु पुन्हा नव्याने जीवनात स्थिरता निर्माण होण्याकरिता अनेक वर्ष निघून जातील. ज्यांचे जीवन शेती, पशुपालन याच गोष्टींवर पूर्णपणे अवलंबून आहे त्यांची कहाणी तर अतिशय करूण  आहे. शहरात सर्व सुखसुवीधांसह राहणाऱ्या लोकांना याचे गांभीर्य कदाचित जाणवणार नाही. एक दिवसाचा पगार देऊन किंवा काही रक्कम दुष्काळ ग्रस्त निधी करता देऊन ते सर्व काही विसरूनही जातील. परंतु खर्या अर्थाने आपण यात  आपले योगदान देऊ शकतो आणि याचा विचार नक्की झाला पाहिजे.  या साठी आपण नक्की काय करू शकतो?
सकाळी उठल्या पासून आपण वीज आणि पाणी या दोन गोष्टीनचा वापर केल्या शिवाय कोणतेही काम करत नाही किंवा या व्यस्त आयुष्यात त्यांचा उपयोग अनिवार्य आहे.  या दोन्हीही गोष्टी वापरताना किती शिस्त बाळगली जाते या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. "वीज आणि पाणी आपला जन्मसिद्ध अधिकार आहे  आणि त्याची हवी तशी उधळपट्टी मी करणारच" हे विचार चुकीचे आहेत, हे आधी आपल्या मनाला समजावणे गरजेचे आहे.  काही वेळा आपण या बाबतीत जागरुकता दाखवत नाहीच परंतु जे जागरूक आहेत त्यांची थट्टाही करतो. असे करण्याने थोड्या वेळा पुरते नक्कीच तुमचे मनोरंजन होईल परंतु भविष्यात वीज आणि पाण्याच्या कमतरतेची समस्या  अशा निष्काळजी पणामुळे सर्वांनाच भोगावी लागणार आहे. पुढच्या  पिढी साठी 
तुम्ही किती रक्कम किंवा जमीन जुमला नावावर ठेवता या गोष्टींपेक्षा वीज आणि पाण्याच्या समस्येतून  पुढची पिढी वाचावी या साठी तुम्ही काय नियोजन कराल याचा नक्की विचार करा. कारण या मूळ गरजा भागल्या नाहीत तर तुमच्या संपत्ती आणि जमिनीला काडीमात्र किंमत उरणार नाही.  गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक शेत जमिनी - घर, हॉटेल्स बांधण्याकरिता वापरल्या जात आहेत. अनेक जंगलांची तोड होत आहे. या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करून आपण आपलेच भविष्य धोक्यात आणत आहोत.  विचार करून कृती करा, वेळ गेलेली नाही, आज स्वतः पासून सुरवात करा आणि भविष्यात इतरांसाठी प्रेरणा बना!


Saturday, March 16, 2013

माझी लाडकी अभिनेत्री : दीप्ती नवल

Dipti Naval

लहान पणापासून जिचे चित्रपट पाहत आले आणि नकळत जिने मनात घर केले,  जिच्या चेहऱ्यावर आजही ते नाजूक हास्य तसच आहे. जीच्या कडे पाहून अतिशय आदर वाटतो. आज पंचावन्न  वर्षे वय  असतानाही तिची तब्बेत तिने उत्तम ठेवली आहे. खर तर ती जशी आधी दिसायची तशीच, किंबहुना त्याहून सुंदर ती आजही दिसते अशी माझी लाडकी अभिनेत्री दीप्ती नवल हिला पाहण्याचा योग वारंवार येत असतो पण आज तिचा फोटो काढण्याचा योग आला.  रविवारी  आम्हा उभयतांना, तिचे  मॉर्निग वॉक च्या निमित्ताने नेहमीच दर्शन घडत असते.  तिच्याकडे पाहिल्यावर नक्कीच एक प्रेरणा मिळते. आज या वयातही नित्यनेमाने सकाळी फिरायला जाण्याचा सराव तिने कायम ठेवला आहे. तिच्याशी बोलताना एक गोष्ट लक्षात आली कि तिची तिच्या कामावरील निष्टा आजही कायम आहे. आणि त्यात ती शक्यतो खंड पडू देत नाही.तिचे छंद तिने आजही जोपासलेले आहेत. तिची फोटोग्राफी , पुस्तके प्रसिद्ध आहेत. अनेक माणसे विविध कारणांनी आपल्या मनाचा ठाव घेत असतात परंतु काही वेळा त्यांच्या संपर्कात गेल्या वर सत्य काहीतरी वेगळेच आहे असे जाणवते. परंतु असा अनुभव दीप्ती नवलला भेटल्यावर आला नाही.  माझ्या या लाडक्या अभिनेत्रीला  ईश्वर  दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो!  

Friday, March 15, 2013

आला उन्हाळा , तब्बेत सांभाळा !

उन्हाळा सुरु झाला आहे. सकाळी उठण्या पासून रात्री झोपे पर्यंतच्या दिनचर्येत झालेल्या बदलांतून हे सहज लक्षात येत आहे. शहाळ्याच पाणी, लिंबाचे/आवळ्याचे  सरबत, ताक , 
कोकम सरबत,वेज सूप , थंडाई ,रोझ सिरप , आणि आता आंब्याचं पन्ह  पिण्याकडे कल  वाढतो आहे तर संत्री , मोसंबी सहज खावीशी वाटू लागली आहेत. शक्यतो शीत पेयांपासून 
दूर राहण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे तब्बेतीची काळजी सहज घेतली जाते. सर्व कामे करताना आपली गती थोडी मंदावली आहे असं वाटत आहे. व्यायाम नियमित होत नसला तरी चालू ठेवणे आवश्यक आहे. मुंबईतील उन्हाळा घामाने बेजार करतो. त्यामुळे सतत पाणी पीत राहणे गरजेचे वाटते. प्रवास करायचाच झाला तरी शक्य झाल्यास उन्हाच्या वेळा टाळून करणे उचित! घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडायचे झाल्यास सन कोट,हात मोजे, गॉगल ,स्कार्फ अशी तयारी अनिवार्य झाली आहे. उन्हाने जळणारी त्वचा काळी पडू नये यासाठी सनस्क्रीन लावणे ओघाने आलेच. आहार हलका घेणे, तळलेले पदार्थ टाळणे , पाले भाज्या आणि सलाड चे प्रमाण रोजच्या आहारात वाढवणे ,हि पथ्ये तब्बेत उत्तम ठेवातील  अशी आशा करूया. प्रयत्न पूर्वक उन टाळणे, न चुकता टोपी / छत्री यांचा वापर करणे श्रेयस्कर. तुम्ही स्वास्थ्य टिकवण्यासाठी यातील काय काय करता आणि या व्यतिरिक्त कोणती काळजी घेता ?

Wednesday, March 13, 2013

संधी

Nature
बरेच वेळा समोर येणाऱ्या संधी या अनपेक्षित व्यक्तीन कडून, अनपेक्षित क्षेत्रा संबंधी,अनेपेक्षित ठिकाणीच येत असतात आणि  ती एक उत्तम संधी होती हे कळायला फार उशीर होतो. तो पर्यंत हातून ती निसटून गेलेली असते.  काही वेळा आपण 
" कारणे द्या आणि काही करू नका" अशा विचारसरणी मुळेही अशा संधींना मुकत असतो. कुणीही काहीही नवीन सुचवले तर त्या गोष्टीला प्रथमतः विचार न करताच 
नकार देणे. किंवा सुचवलेली गोष्ट मी करूच शकणार नाही हे गृहीतक मनात धरून नकार देणे. किंवा केवळ हे मी कधी या आधी करूनच पहिले नाही म्हणून आताही करणारच नाही असा नकारात्मक दृष्टीकोन ठेवणे हि संधी हुकण्याची ढोबळ कारणे असू शकतात. कारणे काहीही असली तरी ज्या एका गोष्टीमुळे आपले आयुष्य बर्याच अंगानी समृद्ध होऊ 
शकतं  अशी एक संधी जरी वाया गेली आणि तीच गोष्ट  सहजपणे स्वीकारलेल्या व्यक्तींना प्रगती करताना पहिले कि नकळतच पश्चाततापाची भावना निर्माण होते. या साठी जीवनाकडे सकारत्मक दृष्टीकोन ठेवून पाहता येणे गरजेचे आहे.  आपल्या व्यवहारातील एकनिष्ठता आणि कष्ट यांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा 
आपण येणाऱ्या संधीला एक आव्हान म्हणून सहज स्वीकारू आणि सफल होण्याच्या दृष्टीकोनातून सतत प्रयत्शील राहू . जीवनातील संधीला ओळखणे आणि त्यावर परिश्रम घेऊन स्वतःची प्रगती साधणे हे समाधानी आयुष्याच एक गमक म्हणावं लागेल. 

Tuesday, March 12, 2013

निष्ठा


समाजसेवेची संधी प्रत्येकाला रोजच्या दिनक्रमात  , रोजच्या व्यवहारात सतत मिळत असते परंतु काहीवेळा ते आपले कर्तव्य किंवा एक सहज व्यवहार असल्यामुळे 
आपल्याला त्याची जाणीव होत नाही. सरकारी कार्यालयात काम करताना याचा अनुभव मला बरेच वेळा येत असतो. कार्यालयात चौकशी साठी आलेल्या  माणसाला 
समाधान कारक उत्तर मिळाले , योग्य वागणूक मिळाली कि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्या सारखा असतो किंवा त्याचे काम झाले आहे हे कळल्यावर चेहऱ्यावर 
झळकणारी कृतज्ञता समाधान देऊन जाते. परतू अशा ठिकाणी काही भ्रष्ट अधिकार्यान  बरोबर जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा फार वेगळे अनुभव येतात. अशाच एका भ्रष्ट अधिकार्याच्या वर्तणुकीचा इथे उल्लेख करावासा वाटतो. आयुष्यभर आपल्याला असलेल्या ज्ञानाचा, अधिकाराचा आणि अनुभवाचा वापर या व्यक्तीने भ्रष्टाचारासाठी केला. केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर हाताखालच्या कर्मचार्यांना हीन वागणूक देऊन, जमेल त्यांना हाताशी धरून आपले वाईट व्यवहार सुरूच ठेवले.  ज्यावेळी निवृत्तीची वेळ जवळ आली त्यावेळी फार मोठ्या मोठ्या समाज सेवेच्या गोष्टी हा माणूस करू लागला. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. केलेल्या कृत्यांची शिक्षा मिळावी त्याप्रमाणे हा मनुष्य सी बी आय च्या धाडीत सापडला.  काही दिवस तुरुंगात राहिल्या नंतर त्याची सुटका झाली परंतु आयुष्य भर केलेल्या पापांचा धडा याच जन्मी वाचवा लागला. सरकारी कार्यालयांकडे बर्याच वेळा याच नजरेने पाहिलं जात ते अशा मुठभर भ्रष्टाचारी लोकांमुळे. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी सांगू शकते कि समाजसेवा खऱ्या अर्थाने करायची असेलच तर ती सरकारी कार्यालयात काम करून जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल. आज प्रामाणिक आणि मेहेनती लोकांची अशा ठिकाणी फार मोठी गरज आहे. सर्व सामान्य नागरिकांसाठी जेव्हा काम करण्याची संधी मिळते तेव्हा , खऱ्या अर्थाने त्यांच्या दुख्हांची आपल्याला जाणीव होते. खरतर बाहेर पडून समाजासाठी काही करता येत नसेल तर, केवळ प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेलं काम निष्ठेने केल्यास तीच खर्या अर्थाने समाजसेवा ठरेल असे म्हणावे लागेल. 

Monday, March 11, 2013

मोर्निंग वॉक

Morning Walk 
गेले काही महिने दर थोड्या दिवसांनी मी एक संकल्प करत असते. काहीच दिवसात तो मोडतो आणि मग नव्या उमेदीने स्वतःला आठवण करून द्यायची वेळ येते. तो संकल्प म्हणजे रोज सुप्रभाती फिरायला जाणे. एक सर्वांग सुंदर व्यायाम म्हणून नियमित चालायला जावे हि इच्छा मनात बाळगून 
रोज सकाळी लवकर उठण्याचा सराव ठेवला आहे   परंतु काही वेळा कामाच्या,झोपेच्या किंवा ऋतूच्या बदलत्या स्वरूपा मुळे ते घडत नाही असे लक्षात 
आले. मग एक कल्पना सुचली. ज्यावेळी फिरायला जाऊ त्यावेळी दिनदर्शिकेवर त्या तारखेला फुली मारणे सुरु केले. महिन्याच्या शेवटी फुल्यांची संख्या बघून स्वतः चीच लाज वाटली. एक स्त्री म्हणून घरातील इतर कामे, कार्यालयातील जबाबदाऱ्या सहज स्वीकारताना, मी  व्यायामा बद्दल इतकी निष्काळजी कशी राहू शकते याचे माझे मलाच आश्चर्य वाटले.  कारण काहीही असो, असेच जर तुमच्याही बाबतीत घडत असेल तर तुमचा अभिप्राय नक्की द्या. या संदर्भात तुम्ही कोणते उपाय अवलंबले ते हि नक्की कळवा.

भारतातील हवाई सेवेचा इतिहास

J R D Tata.

भारतातील हवाई सेवेचा इतिहास  टाटांपासून सुरु झाला आणि आताही ते पुन्हा एकदा 
हवाई सेवा देणार आहेत. जे आर डी  टाटा यांनी १९३२ साली टाटा एअरलाइन्स ची 
स्थापना केली. नेविल विन्सेंट या पायलट च्या मनात आल कि ब्रिटन मधील इम्पिरियल 
एअरवेज च्या मदतीने मुंबई ते कोलंबो दरम्यान हवाई डाक  सेवा सुरु करता येईल. टाटांनी नेविल ला पाठींबा दिला आणि हवाई सेवा सुरु करून १५ ऑक्टोबर १९३२ साली टाटांनी सिंगल इंजिन च्या दि हेवीलंड पस मॉथ विमानाने एअरमेल पाठवण्याचा विडा उचलला. टाटांनी कराचीहून विमान प्रवासाला सुरुवात केली व अहमदाबाद मार्गे त्यांनी मुंबईच्या जुहु विमानतळावर  विमान उतरवले. नंतर नेविल तेच विमान बेल्लारी मार्गे मद्रास ला घेऊन गेले. टाटा एअरलाइन्स कडे सुरवातीला एक पस मॉथ आणि एक लेपर्ड मॉथ विमान , खजुराच्या पानांनी झाकलेली एक शेड, एक पूर्णवेळ वैमानिक, एक अर्ध वेळ इंजिनियर आणि दोन अप्रेन्तीस मेकॅनीक  होते.  आपल्या स्थापनेच्या पहिल्या वर्षातच टाटा एअर लाइन्स ने १,६०,००० मैलांचा टप्पा गाठला तसेच  १५५ यात्री आणि १०.७१ तन टपाल पोहोचवण्याचे काम केले. दुसर्या महायुद्धा नंतर टाटा एयरलाइन्स ची सेवा सुरु झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९४८ साली भारत सरकारने एयरलाइन्स चे ४९% शेअर्स खरेदी केले आणि टाटा एअरलाइन्स चं नाव बदलून एयर इंडिया झालं. आणि त्यालाच 
एयर इंडिया इंटरनेशनल नावाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा चालवण्याची अनुमती दिली गेली.पहिली आंतरराष्ट्रीय सेवा ८जून १९४८ ला मलबार प्रीसेंज (लॉकहिल कॉस्टेलेशन ) या विमाना द्वारे मुंबई ते काहिरा आणि जिनेवा मार्गे लंडन च्या हिथ्रो एयर पोर्ट पर्यंत दिली गेली. १९६० साली जेट विमानांच्या युगात एयर इंडिया इंटरनेशनल चा प्रवेश झाला. 

सौजन्य नवभारत टाइम्स 




Sunday, March 10, 2013

फसवणूक

Europe

आजच वृत्तपत्रात आगाऊ पैसे घेऊन लोकांना फसवल्याची बातमी एका पर्यटन कंपनी संदर्भात वाचनात आली. फसवणुकीच्या धक्क्याने असे पैसे गुंतावाणाऱ्या एका व्यक्तीचे निधन झाले. बरीच माणसे सहकुटुंब परदेशी वारीची मजा घेण्याकरता दर महिन्याला ठराविक रक्कम अशा कंपन्यात गुंतवत असतात.. असे करताना हि कंपनी दिवाळखोरीत गेली तर काय हा विचार मनातही येत नाही. परंतु असे पैसे दर महिना अशा कंपनीत गुंतावाण्या पेक्षा आवर्ती ठेव योजनेत गुंतवून आपल्याला प्रवासाला जायचे असेल त्यावेळी वापरता येतात. किंबहुना 
या दरम्यान काही आर्थिक आपत्ती आल्यास ते पैसे इतरही ठिकाणी वापरण्याची संधी हातात ठेवता येते 
उजाडणारा प्रत्येक दिवस हा रोज नवीन आनंद , नवीन उत्साह घेऊन येत असतो.तसेच नवीन समस्या, नवीन प्रश्न, नवीन आव्हानही घेऊन येतो. या दोहोंचा सुवर्णमध्य साधूनच प्रत्येक पाऊल उचलले गेले तर आपण भविष्य काळात निर्माण होणार्या बर्याच संकटाना टाळू शकतो. आता सुट्ट्यांचा सिझन सुरु होईल.प्रत्येक जण कुटूंबासह चार दिवस पर्यटन स्थळी जाण्याच्या विचारात असेल. परंतु घरातील वृद्ध व्यक्ती, वाढलेल्या महागाई मुळे होणारा वाढीव प्रवासाचा खर्च ,मुलांच्या शिक्षणा साठी भविष्यात लागणारा पैसा इत्यादी , या सर्वांचा उत्तम ताळमेळ घालूनच प्रत्येक जण आपल्याला झेपेल अशा ठिकाणी चार दिवस जाण्याचे ठरवेल. तसे न केल्यास , कुणाच्या भरीस पडून किंवा इतरांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही एखादी गोष्ट आयुष्यात करत राहिलात , तर भविष्यात तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल हे नक्की. त्यामुळे आपल्यासाठी कोणत्या पद्धतीचे आर्थिक नियोजन योग्य आहे आणि त्या साठी कोणत्या गोष्टीना जीवनात प्राथमिकता दिली पाहिजे याचे ज्ञान असणे गरजेचे आहे.