Sunday, March 17, 2013

दुष्काळ : जबाबदार कोण?

Drought

सकाळी उठल्यावर डोळे उघडल्या उघडल्या आपण 
कराग्रे वसते लक्ष्मि,
कर मध्ये सरस्वती,
करमुले  तू गोविन्दम,
प्रभाते कर दर्शनम!
हि प्रार्थना करतो. आणि अशा 
पवित्र हातानी दिवसभरात योग्य  व पवित्र कर्म घडावे अशी अशा करतो.  
सध्या महाराष्ट्रासह बरीच राज्ये दुष्काळ ग्रस्त आहेत. कमी पाऊस आणि पाण्याचे अयोग्य नियोजन, रखडलेले प्रकल्प किंवा सीमा वाद यात राज्यकर्ते अडकलेले असताना सामान्य माणूस या दुष्काळाचे तडाखे सोसत आहे. गावाच्या गावं सोडून आपल्या कुटुंबांसह लोकांना स्थलांतर करावं लागत आहे. अनेक कुटुंबांचे जीवन अस्थिर झाले आहे आणि भविष्य अंधारात आहे. कदाचित त्यांना काही दिवस आर्थिक मदत मिळेलही परंतु पुन्हा नव्याने जीवनात स्थिरता निर्माण होण्याकरिता अनेक वर्ष निघून जातील. ज्यांचे जीवन शेती, पशुपालन याच गोष्टींवर पूर्णपणे अवलंबून आहे त्यांची कहाणी तर अतिशय करूण  आहे. शहरात सर्व सुखसुवीधांसह राहणाऱ्या लोकांना याचे गांभीर्य कदाचित जाणवणार नाही. एक दिवसाचा पगार देऊन किंवा काही रक्कम दुष्काळ ग्रस्त निधी करता देऊन ते सर्व काही विसरूनही जातील. परंतु खर्या अर्थाने आपण यात  आपले योगदान देऊ शकतो आणि याचा विचार नक्की झाला पाहिजे.  या साठी आपण नक्की काय करू शकतो?
सकाळी उठल्या पासून आपण वीज आणि पाणी या दोन गोष्टीनचा वापर केल्या शिवाय कोणतेही काम करत नाही किंवा या व्यस्त आयुष्यात त्यांचा उपयोग अनिवार्य आहे.  या दोन्हीही गोष्टी वापरताना किती शिस्त बाळगली जाते या कडे लक्ष देणे गरजेचे आहे. "वीज आणि पाणी आपला जन्मसिद्ध अधिकार आहे  आणि त्याची हवी तशी उधळपट्टी मी करणारच" हे विचार चुकीचे आहेत, हे आधी आपल्या मनाला समजावणे गरजेचे आहे.  काही वेळा आपण या बाबतीत जागरुकता दाखवत नाहीच परंतु जे जागरूक आहेत त्यांची थट्टाही करतो. असे करण्याने थोड्या वेळा पुरते नक्कीच तुमचे मनोरंजन होईल परंतु भविष्यात वीज आणि पाण्याच्या कमतरतेची समस्या  अशा निष्काळजी पणामुळे सर्वांनाच भोगावी लागणार आहे. पुढच्या  पिढी साठी 
तुम्ही किती रक्कम किंवा जमीन जुमला नावावर ठेवता या गोष्टींपेक्षा वीज आणि पाण्याच्या समस्येतून  पुढची पिढी वाचावी या साठी तुम्ही काय नियोजन कराल याचा नक्की विचार करा. कारण या मूळ गरजा भागल्या नाहीत तर तुमच्या संपत्ती आणि जमिनीला काडीमात्र किंमत उरणार नाही.  गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक शेत जमिनी - घर, हॉटेल्स बांधण्याकरिता वापरल्या जात आहेत. अनेक जंगलांची तोड होत आहे. या सर्व गोष्टींकडे डोळेझाक करून आपण आपलेच भविष्य धोक्यात आणत आहोत.  विचार करून कृती करा, वेळ गेलेली नाही, आज स्वतः पासून सुरवात करा आणि भविष्यात इतरांसाठी प्रेरणा बना!


No comments:

Post a Comment