आजचा दिवस खरच माझ्याकरिता उत्साहाचा किंवा उत्सवाचा दिवस आहे म्हटले तरी वावगे होणार नाही. आज आमच्या कार्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन आहे. असे दिवस कर्मचाऱ्यांकरिता वर्षभराच्या कामाचा शीण घालवणारे व नव्याने आपली कर्तव्ये पार पाडण्याकरिता स्फूर्ती देणारे ठरतात. अनेक वर्ष एकाच
कार्यालयात काम करत असू तर तिथे एका परिवारा प्रमाणेच वागावे लागते.
त्याहूनही जर सह कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल तर एकमेकला सहकार्य करूनच कामे पार पाडावी लागतात. एकंदरीत असा वार्षिक उत्सव हा एका पारिवारिक कार्यक्रमा इतकाच महत्वाचा असतो.
मनुष्य सतत काहीना काही शिकण्याची , नव्याने अनुभव घेण्याची इच्छा बाळगत असतो आणि या इच्छेतूनच आणि कृतीतून तो स्वतःचे जीवन घडवत असतो. ज्याप्रमाणे लहान मुलांकरिता त्यांचे पालक, शिक्षक आणि समाज हे त्याच्या सर्वांगीण विकासाचा एक अविभाज्य भाग आहेत , त्या पद्धतीतच माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे कार्यालय, त्याला सहकार्य करणारे सहकर्मचारी , त्याचे कुटुंब यांचा त्याच्या प्रत्येक यश आणि अपयशात मोठा वाट असतो. त्याचे मानसिक आरोग्य बर्याच अंशी यावर अवलंबून असते. यशाचा , आनंदाचा, उत्साहाचा काही काळही माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदलू शकतो , चांगले बदल घडवू शकतो , फक्त हे अनुभवण्यासाठी आयुष्यात लागते, परिश्रम , निष्टा आणि कार्त्याव्याची जोड !