Thursday, February 28, 2013

अर्थसंकल्प

अर्थसंकल्प मग तो देशाचा असो किंवा घराचा योग्य 
रीतीने त्याची अंमलबजावणी न झाल्यास मोठ्या 
संकटाना सामोरं जाव लागतं यात शंका नाही. आर्थिक 
नियोजन योग्य पद्धतीने करत असताना , रोजच्या 
जीवनातही विविध स्तरावर विचार झाला पाहिजे. 
किंबहुना मानसिक  कुचंबणा न होता , कुटुंबातील
 प्रत्येक व्यक्तीच्या गरजांचा 
विचार करून ते होणे गरजेचे आहे.  बर्याचदा कुटुंबांची 
विभागणी होण्याचे मुख्य कारण या "अर्था " भोवतीच 
असते. आपले कुटुंब जपायचे असेल तर सर्वार्थाने 
त्यांचा विचार करण्याची सवय करणे अनिवार्य  आहे.

Wednesday, February 27, 2013

आनंदाचा ठेवा !


सहज विचार करत असताना एक गोष्ट मनात आली.  जीवनात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या नैसर्गिक आहेत आणि कुठेही खरेदी करता येत नसल्या तरी त्या आपल्याला मोफत मिळालेल्या 
आहेत. आपला श्वास, विश्रांती, आरोग्य, हास्य,  आयुष्य सभोवतालचा निसर्ग( उन, वारा , पाऊस, ) आणि इतर अनेक गोष्टी.  आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा आनंददायी गोष्टी सहज उपलब्ध असल्याने आपल्याला त्याचा सहजच विसर पडतो 
आणि आपण कृत्रिम आनंदात रममाण होऊ पाहतो. कृत्रिम गोष्टीन पासून आनंद मिळवावा लागतो परंतु ज्या गोष्टी स्वतःच आनंदाने परिपूर्ण आहेत अशा गोष्टींच्या सहवासाने आपले आयुष्य थोड्या कालावधीत आनंदी होते. आनंद मिळवायचा असेल तर स्वतः आनंदी असले पाहिजे.  त्यासाठी दूर कुठेही न जाता आपल्यात आणि आपल्या सभोवतीच  त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

Tuesday, February 26, 2013

अग्रक्रम


जीवनात अग्रक्रम कोणत्या गोष्टीना द्यावा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते.  स्वतःहून एखादी जीवन पद्धती अवलंबणे आणि कुणाच्या भयाने एका विशिष्ठ जीवन पद्धतीत सतत जगत राहणे यात फार मोठा फरक आहे. जीवनात बंधन , त्याग या सारख्या गोष्टी योग्य ठिकाणी आपणहून स्वीकारल्या गेल्या पाहिजेत.कुणाला घाबरून किंवा कुणावर अवलंबून असल्यामुळे 
त्या स्वीकारल्या गेल्यास एक दिवस त्याचे रुपांतर अयोग्य जीवन शैलीत होते आणि त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतात. 

Monday, February 25, 2013

आयुष्य

आयुष्यातील चढ उतार कुणालाही चुकले नाहीत.  संकटं आली कि हातात हात घालून येतात. आर्थिक, मानसिक ,शारीरिक एकदम एकत्र  जमतात . एकातून बाहेर पडाव तर दुसरं हजर असत . परंतु परिस्थिती बदलली कि हेच सगळ सोपं  वाटत . सगळ्या संकटांना सहज पळवता येत आणि" अरे हे आपण आधी का नाही केल ?"असं स्वतः लाच विचारावस वाटत. संकटं गेली तरी मनावरचे घाव भरत नाहीत. असं असलं तरी आयुष्य काही थांबत नाही. म्हणून सतत आनंदी राहावं, आयुष्याला हसत मुखाने सामोर जाव . संकटकाळी इतरांना मदत 
करावी , कधीतरी याच नावेत आपणही प्रवास करत होतो याची जाण सतत असू द्यावी.

Sunday, February 24, 2013

नातं

आजकाल प्रत्येकाला दिवस उजाडल्या पासून डोळे 
मिटे पर्यंत लहान मोठ्या अशा अनेक समस्यांना तोंड 
द्यावे लागते. काही गोष्टींची कल्पना असते तर काही 
अचानक समोर येत असतात. अशा वेळी घरातल्यांनी /जवळच्यानी आपल्या नात्यातील नाट्कीयता बाजूला ठेवून केवळ माणुसकीच्या दृष्टीकोनातून वागण्याची गरज असते.  आणि बरेच वेळा असे न झाल्यामुळे रुसवे / फुगवे ,मान /अपमान  यांच्यात मनुष्य गुरफटत जातो. परिणामी आपापसातील दुरावा वाढत जातो. नात कोणतही
असलं तरी समोरची व्यक्ती हि आपल्या प्रमाणेच एक माणूस आहे आणि ती व्यक्ती आपल्या कुटुंबाचा एक भाग असल्यामुळे तिच्या भावनाना जाणून वागण आपलं कर्तव्य आहे हा भाव लहानान पासून मोठ्यांपर्यंत रुजण्याची गरज आहे.

आठवणी

आठवणींच्या महालात आहेत आनंदाची अनंत दालने 
काही छोटी ,काही मोठी ,काही सुशोभित तर काही 
साधी ... पण प्रत्येकाचा आहे स्वतःचा असा ठसा 
विचार करून पहा कदाचित तुम्हालाहि सापडेल असा 
आनंदाचा वसा.

तडजोड

कठीण असत भावनांना मुरड घालणं , 
कठीण असत वेळ प्रसंगी त्याग करणं 
कठीण असत फळाची अपेक्षा न करता कष्ट करत राहणं , 
या सगळ्याला लागते सातत्य आणि एकनिष्ठतेचि जोड, 
तरच सर्वार्थाने करू शकतो आपण जीवनाशी तडजोड.

ज्ञानाची पहाट

जर येणारा एकटा येतो आणि एकटा जातो. 
मग तो या येण्या जाण्याच्या मधल्या 
प्रवासातील एकटेपणाला का घाबरतो?
खरंतर या एकटेपणातूनच उचंबळते 
भक्तीरसाची लाट , एक दिवस जीवनात 
तीच घेऊन येते ज्ञानाची पहाट !

ईश्वरप्राप्ती

जीवनाचा प्रवास आणि नदीचा प्रवाह यात फार फरक नाही. अनेक 
दगड, धोंडे, खाच , खळगे या सारख्या अनेक अडचणी पार करत नदी आपला प्रवास सुरूच ठेवते. वाटेत येणारी आसपासची भूमी सुजलाम सुफलाम करते. कधी माणसाने फारच त्रास दिला, तिचा प्रवाह वळवून तिच्या प्रवासात मुद्दामून अडथळे आणले तर त्याला रुद्र रूपही दाखवते. आपल्या गतीने ती चराचराला प्रफुल्लीत करते. या सर्वा मुळे तिची निर्मलाता टिकून राहते. जो मनुष्य नदी सारखे जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करील, त्याच्या जीवनात पावित्र्य, मांगल्य आणि निर्मलाता ओसंडून वाहील यात शंका नाही. आणि त्याच्या सत्विचार आणि सत्कर्मानेच त्याला ईश्वराची प्राप्ती होईल.

जीवनाची नौका

वादळात सापडलेली नौका प्रत्येक वेळी बुडतेच असे नाही 
नाविकाचा संयम आणि नौकेची वादळाला झेलण्याची शक्ती 
त्यात पणाला लागते. जीवनही काहीसं असच आहे. आपल्या 
जीवन नौकेचे आपणच नाविक आहोत , संयमी वृत्ती आणि 
आंतरिक शक्तीच्या बळावर आपण जीवनातील अनेक वादळे 
न मोडता आणि न डगमगता सहजी परतवू शकतो. त्यासाठी 
लागतो फक्त विश्वास , स्वतः बद्दलचा आणि त्या अज्ञात शक्ती 
वरचा जी या चराचरा ची काळजी घेते.

मैत्री

मैत्रीच नात जीवाभावाच असावं . जिथे स्वार्थ निर्माण होईल 
तिथे या नात्याचा अर्थ संपला असा समजावं . मैत्री हि अधिकारा 
साठी नसून स्वतः ला आकारण्या साठी आहे. मैत्रीत जीवंतपण 
असावं . मैत्रीत मनमोकळेपण असावा , प्रेम असावं पण 
मैत्री हि कुणालाहि बंधनात अडकवण्यासाठी नसूनहि त्यातील 
बांधिलकी जपण्यासाठी असावी. तरच अशी मैत्री आकाशात 
उंच भरारी मारणाऱ्या पक्षा प्रमाणे स्वतंत्र आणि उत्तुंग राहील.

प्रगती

आपली प्रगती साधायची असेल तर 
दुसर्याच्या अधोगतीची इच्छा कधी बाळगू नये .
आपल्याला आनंद मिळावा असा वाटत असेल तर 
दुसर्याचा आनंद हिरावून घेऊ नये. 
आपली स्वप्न पूर्ण व्हावी असा वाटत असेल 
तर इतरांची स्वप्न भंग करू नयेत.
इतरांची अडवणूक करून आपण स्वतः ची
तात्पुरती करमणूक करू शकू परंतु
या वृत्तीची बिज आपला घात कधी करतील
त्याची कल्पनाही आपल्याला येणार नाही.

जीवन पद्धती

एक निमिष, एक निमित्त ,एक अनुभव, एक दिवस माणसाचं 
आयुष्य बदलू शकते. तो बदल चांगला असेल किंवा वाईट .
मनुष्याच्या भावना, हेतू, कृती आणि अभिव्यक्ती मनुष्याचं 
भविष्य ठरवत असतात. हि प्रक्रिया एका दिवसात घडत नाही 
तर ती दीर्घ काळात घडणारी नैसर्गिक कार्य प्रणाली आहे. परंतु
त्याच दृश्य स्वरूप अचानक समोर येत आणि काही वेळा मनुष्याच आयुष्य समृद्ध होत तर काही वेळा त्याच्या पदरी मोठे दुखः किंवा निराशा येते. या करिता उत्तम विचार आणि उत्तम आचार हि आपली जीवन पद्धती असणे गरजेचे आहे.

भावविश्व

काही वेळा वरकरणी वाटणारं सुख हे दुख्हाच च कारण असु शकतं .त्यामुळे इतर सर्व सुखी आणि मी मात्र दुःखी हि भावना मनातून 
काढून टाका. आपल्या सुख दु:खाची तुलना इतरांच्या जीवनाशी 
करू नका. दुसर्याच्या दुख्हात कधी आपले सुख शोधू नका. सुख 
आणि दुखः येतात आणि जातत पण आपले भावविश्व मात्र 
बदलून टाकतात. सुख दुख्खाच्या या चक्रात भ्रमित होऊ नका. 
आपल्या बुद्धीची स्थिरता ढळू देऊ नका.

गणित

जीवनाच एक गणित आज उलगडल्या सारख वाटलं 
फिरून फिरून निघणाऱ्या तक्रारीच्या सुराला 
आज पळवावसं वाटलं. 
करत होते तक्रार जेव्हा परिणामांची केली 
नव्हती कल्पना, अनुभवातून का होईना 
पण शहाणपणाला आपलंसं करावसं वाटलं . 
घडून गेल्या गोष्टी म्हणून का तेच
आठवत बसायचं आहे. नव्या उमेदीने
नव्या धैर्याने जीवन पुन्हा एकदा जगायचं आहे.

निवांत क्षणी विचारांत त्याने स्फूर्ती दिली.त्याच्या असण्याची जाणीव मनाला स्पर्शून गेली. खरच तो दिसत नाही म्हणून त्याचं अस्तित्व नाही असं मानायचं कि, त्या नेमक्या क्षणी मिळणारा त्याचा आधार तो असण्याची साक्ष आहे असं समजायचं ? ते काहीही असलं तरी त्याची मला गरज आहे, अंतरीच्या दुक्खावर केवळ त्याच्या अशा अस्तित्वाची फुंकर आहे. असा तो ईश्वर सर्वांचा आहे पाठीराखा खरच पटत नसेल तर एकदा
हाक मारून बघा.

असं कधीतरी प्रत्येकाच्या अनुभवास येत. .......

आज कुणाच तरी वागणं जिव्हारी लागलं 
नयनांचा बांध फोडून अश्रुना वाहावं लागलं 
मन द्विधा स्थितीत असताना चेहऱ्यावर 
हसू ठेवावं लागलं . नक्की कुठे चूक घडली 
ते फिरून फिरून आठवावं लागलं . घडलं
काय ते कळल नाही. पण मनात ओझं
जपावं लागलं . हे कोड उलगडेल तेव्हा
उलगडेल पण मनाला शांत करावं लागलं .
तेजाने लखलखणारा सुर्य आपल्या तेजाचा अहंकार बाळगत नाही तर चरचर स्रुष्टी ला जीवन देऊन तिची अखंड सेवा करतो. आपल्या यश, कीर्ती आणि धनाने तेजाळणारे अनेक 
सुर्य समाजात आहेत परंतु सृष्टीला व्यापणाऱ्या त्या तेजाच्या गोळ्या एवढे दातृत्व जर प्रत्येका अंगी आले तर सोनियाचा
दिवस यायला वेळ लागणार नाही. अशा दातृत्वाचाहि अहंकार बाळगू नका किंवा गवगवा करू नका. निस्वार्थ मनाने, इतरांना
न दुखावता जमेल तेवढे नक्की करा तरच त्या ईश्वराची खरी सेवा केल्याचे पुण्य मिळेल.
आज आपल्याशी चांगली वागणारी माणस उद्या वाईट का वागतात?आणि कदाचित त्याच नात्याची पुन्हा नव्याने ओळख होऊन पुन्हा ती जवळही येतात. हा आयुष्यातील सुख दुख्हांचा फेरा आहे.काही वेळा स्वार्था पोटी, बदललेल्या गरजांपोटी किंवा जीवनातील बदललेल्या प्राथमिकतान मुळे माणूस आपल्याला हवे तसे बदल घडवू पाहतो. यात चूक काय आणि बरोबर काय हे पाहण्याची गरजही काही वेळा त्या व्यक्तीला वाटत नाही आणि कालांतराने अशा थोडक्या इर्षे मुळे जीवनात फारमोठी भावनिक दरी निर्माण करून घेतो. उलटपक्षी योग्य अयोग्याचे तारतम्य बाळगणारी व्यक्ती अशा छोट्या वादळातून स्वतःला आणि इतरांना सहज वाचवू शकते आणि आपले आणि आपल्या भोवतालच्या लोकांचे भावविश्व प्रसन्न करू शकते.
आकाशातील चांदणं मनाला शीतलता देतं . 
चंद्राच सौंदर्य त्यात उठून दिसतं . 
मला अस वाटतं कि घरातल्या कर्त्याने 
असाव चंद्रा सारखं , ज्याच्या शीतलतेमुळे 
कुटुंबाने त्याला मानाने वागवावं . मान 
हा मागून मिळत नसतो तो आपल्या 
कर्तुत्वाने मिळवावा लागतो. म्हणूनच
अनेक डाग असूनही चंद्र चांदण्यात
ताठ मानेने मिरवतो.
भवताली घडणार्या घटना काही वेळा मनाला बेचैन करून जातात. काही वेळा आपणही अशा गोष्टींसाठी नकळत कारणीभूत तर नाही न असा विचारही करायला लावतात. वाईट गोष्ट घडली कि सर्व दहा तोंडानी बोलतात, कीस पडतात आणि काही काळाने सर्व विसरून जातात. परंतु खऱ्या अर्थाने आपण त्यातून काय शिकलो आणि आपण आपल्या आयुष्यात कोणते सकारात्मक बदल केले या बद्दल आपण एकमेकांशी कधीच बोलत नाही. कारण आपण अवलंबलेले धोरण हे कदाचित समोरच्याला आवडेल असे नाही किंवा तो आपल्याला पुरोगामी समजेल अशी भीती मनात असते. घटना घडून गेल्या नंतर जीवनात
घडवलेल्या बदलांवर चर्चा होणे गरजेचे आहे. कारण ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. दुसर्यांना सतत दोष देऊन आपण भवताली योग्य ते बदल घडवून आणू शकत नाही त्या साठी आपल्यालाहि काही नियम, शिस्त, सकारात्मक विचार अंगीकारावे लागतात.
बरी वाईट वेळ हि आयुष्यात प्रत्येकावरच येते. किंबहुना 
कमी अधिक फरकाने आयुष्यात प्रत्येकाला सतत 
समस्यांना तोंड द्याव लागत असतं . अशा वेळी माझं दुःख 
मोठं आणि दुसर्यांना मिळणारे सुख मोठं अशा भ्रामक 
कल्पनांमध्ये दुख्ही किंवा रममाण राहणं अयोग्य आहे.
तसच दुसर्याच्या दुख्हाने सुखी होणं हा केवळ मुर्खपणा आहे.
आयुष्यात रोजच्या रोज होणाऱ्या बदलांना , मग ते चांगले असोत अथवा वाईट , नव्या उमेदीने आपण कसे सामोरे जातो यावर बर्याच अंशी आपल्या जीवनातील शारीरिक , मानसिक व आर्थिक तोल अवलंबून असतो.
आनंद हा चराचरातील कोणत्याही साध्या गोष्टीतून मिळू शकतो.
त्यासाठी फार डौल , दीमाख किंवा ऐशोआरामाची आवश्यकता 
नसते. आपले शरीर(आरोग्य), वाणी, विचार, धन दौलत हि सर्व असा आनंद मिळवण्याची अनेक माध्यम आहेत. यातील सर्व गोष्टी सर्वांकडे सारख्या प्रमाणात नसल्या तरी , प्रत्येकाला
आनंद घेण्याचा आणि देण्याचा अधिकार देवाने सम प्रमाणात दिला आहे.असा आनंद जीवनात कसा मिळवावा आणि वाढवावा तसेच तो इतरांना कसा द्यावा हे ज्याच्या त्याच्या वृत्ती वर अवलंबून असते.
कधी कधी भावना आशीर्वाद होऊन आनंदी करते 

तर कधी त्याच भावनांचे क्रंदन शाप घेऊन येते.
यासाठी भावना शक्यतो पवित्र व उदात्त असाव्या 

ज्यायोगे त्या परतताना समाधानाच्या रुपात 

परताव्या. आपण जसे व्यक्त होऊ भावना तेच 
रूप घेते, कधी सुखाचे तर कधी निराशेचे सूर गाते.
भावना व्यक्त करणं हि जीवन पद्धती असावी पण 
त्या योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य तो मान राखून व्यक्त होत आहेत कि नाही याची काळजी जरूर घ्यावी. समोरची व्यक्ती हि फारच दयाळू असेल तर ती सर्व सहन करते या विचारांनी तिला गृहीत धरू नये.कदाचित काही वेळा अशा गृहीताकांमुळे आपला भ्रमनिरास होण्याची शक्यता जास्त असते.या उलट आपल्या वयाचे , प्रतिष्ठेचे , योग्यतेचे उचित भान राखून वर्तन केल्यास नामुष्की ओढवणार नाही.
जीवनाला अध्यात्माची जोड असेल तर काही गोष्टी 
जीवनात आपल्या भल्या साठी घडत गेल्या किंवा 
आजही घडत आहेत याची प्रचीती येते. काही गोष्टी अशाही घडतात ज्या प्रथम दर्शनी विचार करता फारच विरोध भासी असतात परंतु त्यांचे भविष्यात होणारे परिणाम सकारात्मक असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा विचार केवळ समाज काय म्हणेल याच दृष्टीकोनातून न करता आपल्या आत्मारामाला , आपल्या अंतर्मनातील परमेश्वराला काय वाटेल याचा विचार करून केल्यास आपण चुकीच्या मार्गापासून परावृत्त राहू आणि तरीही सुखी , समाधानी आणि आनंदी जीवन जगू शकू.
ज्या ठिकाणी आपण राहतो , ज्या समाजात आपण वावरतो 
तिथले नियम अनुसरणे हे आपले कर्तव्य असते. आपल्या मुळे 
तिथली शांती भंग तर होत नाही न याची काळजी घेण्यात 
कोणताही कमीपणा नसून आपल्या स्वभावातील उत्तम 
गुणांना या मुळे नव्याने उभारी मिळते. यात नकळत
आपण आपल्या मनालाही शांत करत असतो. असे
करण्याने आपल्या आयुष्यात बरेच चांगले बदल
आपण सहज करू शकतो व इतरानाही त्यात सामावून
घेऊ शकतो. "जीयो और जिने दो" हे वचन खर्या
अर्थाने अनुभवू शकतो.
भविष्याच्या सुरक्षेसाठी वर्तमान उत्तम असणे गरजेचे आहे.
वर्तमानातील सदवर्तनाने भविष्यातील बरीचशी संकटे 
नकळत टाळली जातात. काहीवेळा ह्या गोष्टी फार 
क्षुल्लक भासतात परंतु त्यांकडे दुर्लक्ष केल्यास 
मोठ्या कसोटीतून जावे लागते. त्यावेळी 
कुणाची साथ मिळो न मिळो पण आत्मबलाची
साथही मिळत नाही. आत्मबल तेव्हाच वाढेल
जेव्हा आपण स्वतःहूनच काही बंधनांचे काटेकोरपणे
पालन करू.
सहवासातून माणसं कळतात आणि रीत मन 
भरून जातात. काही बऱ्या काही वाईट गोष्टींचे 
अनुभव पुन्हा पुन्हा येत राहतात . काय समजून 
घ्यायचं कस जुळवून घ्यायचं हे ज्याच त्याला 
ठरवावं लागत पण अस करताना आपल्या 
माणसांचं मनही जपावं लागतं . हि आहे 
तारेवरची कसरत पण तरीही हे करावं लागतं
एका मर्यादे पलीकडे नक्की आपल्याला काय
हवं आहे ते ठरवावं लागतं .
आपल भावविश्व आणि आपली अभिव्यक्ती या खुपदा भिन्न 
असू शकतात. भावविश्वात जगातील कोणत्याही गोष्टीना 
प्रवेश असतो परंतु आपली अभिव्यक्ती हि काही बंधने आणि 
नियमांना अनुसरूनच असावी लागते. यापुढे हि जाऊन असं 
वाटत कि म्हणूनच प्राचीन जीवन पद्धतीत योग्य विचार, 
आचार , नियम यांना महत्वाचे स्थान होते ज्यायोगे मनुष्याची 
व्याकुळता/ क्लेश /आसक्ती नियमित व संयमित राहत असे. 
कदाचित निरोगी आयुष्याचे हे एक मोठे रहस्य आहे.
आपल्यातली किती जण तब्बेतीच्या बाबतीत सच का 
सामना करू शकतात? किती जण ३५,४०,४५शी जवळ 
आली कि काही बंधन आपणहून आपल्या आहार विहारावर 
घालून घेतात? किती जण नियमित व्यायाम करतात?
आणि किती जण आहारतज्ञाचा सल्ला घेतात आणि त्या 
प्रमाणे आहाराचे योग्य नियोजन करतात. आजच्या
काळातील व्यस्त वेळापत्रात या गोष्टीना प्राधान्य देणे
गरजेचे आहे. वैद्यांनी टेस्ट करून घ्या सांगे पर्यंत वाट पाहण्या पेक्षा ठराविक वया नंतर किमान सहा महिन्यांनी टेस्ट स्वताहून करून घेणे उत्तम. आपण निरोगी राहिलो तरच जीवनाचा निकोप आनंद घेऊ शकू यात शंका नाही.
नाविनाचा ध्यास आणि जुन्याची हि आवड खास अशा पद्धतीतील 
जीवनशैली माणसाला नेहमीच कार्यक्षम ठेवते. नवीन गोष्टी शिकण्याची ओढ आपल्याला तरुण पिढीशी जोडून ठेवते तर परंपरेनुसार केलेल्या गोष्टी वडीलधार्यांचा विश्वास वाढवतात. आपल्याहून लहानांशी किंवा तरुणांशी तरुणाई प्रमाणे जुळवून घेणे , त्यांच्यातलेच एक होऊन त्यांना समजून घेणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे हे नित्याचे झाल्यास मनात मनात दुरावा कधीही येणार नाही. उलटपक्षी घरातील तरुण पिढीला तुमच्या बद्दल आदर वाटू लागेल. नित्य नवा संवाद परिवाराला एकत्र आणेल .अशा गोष्टी पिढ्यान पिढ्या घडल्या तर पूर्ण कुटुंबात प्रेम, विश्वास आणि प्रगती यांचा आलेख उंचावतच राहील.
सद्भावनेने केलेलं छोटास कामही जीवनात आशीर्वाद आणि 
प्रेमाच्या रूपाने समोर येतं. असे आशीर्वाद आणि स्नेह 
कोणत्याही बाजारात विकत मिळत नाहीत आणि कितीही 
श्रीमंत असला तरी मनुष्य अशा गोष्टी आर्थिक किंवा इतर 
कोणत्याही बलाने मिळवू शकत नाही. जीवनातील अशा
सत्कृत्यातून मिळालेल्या आनंदाचा अनुभव हा स्वानुभवच
असावा लागतो. त्यातून मिळणाऱ्या समाधानाची तुलना
कशाशीही करता येत नाही. प्रत्येकाने ठरवून दिवसातून
एक काम जरी या पद्धतीत केले तर काही दिवसातच
रोजच्या व्यवहारात सकारात्मक बदल दिसून येतील हे नक्की.

जीवनाच्या संघर्षात जीव ओतूनही मृदू
राहावा लागत. तर कधी कठोर होऊन
निर्णयाप्रद जाव लागतं . प्रसंगानुरूप /
गरजेनुरूप सतत बदलावं लागतं . एक
मात्र नक्की कि यात तत्वांना मुरड न
घालता कायम आपल अस्तित्व टिकवाव
लागतं . जीवनाचा खेळ दाखवतो नित्य
नवीन रंग , प्रत्येक रंगात त्याच तन्मयतेन
रंगून जाव लागतं .

तुम्ही सधन आहात म्हणून जो निर्धन आहे त्याला कमी लेखू 
नका. सधनता आणि श्रीमंती यांची गल्लत करू नका.
अशी सधनता जी उत्तम आरोग्य, उत्तम विचार आणि उत्तम 
आचार यांना प्रवृत्त करते, जी सधनता अहंकारा पासून दूर 
ठेवते आणि निर्हेतुक परोपकारालाही प्रवृत करते तिला खरी श्रीमंती माना .यातूनच आत्मोन्नत्ती चा मार्ग सापडेल. इतरांना हीन लेखून, त्यांच्या दौर्बाल्याचा फायदा घेऊन 
आयुष्यातील काही दिवस नक्कीच चांगले जातील परंतु
आयुष्याचा शेवट नक्कीच वाईट होईल यात शंका नाही....
जीवनात भावनांचा खेळ सतत सुरु असतो . योग्य किंवा 
अयोग्य कोणत्याही कृतीला प्रवृत्त करत राहतो.
अशा वेळी संस्कार महत्वाचे ठरतात. नकळत 
चुकीच्या मार्गापासून परावृत्त करत राहतात.
सद्विचार आणि सदाचार पुन्हा पुन्हा आठवतात. 
आपण वागतो आहोत ते योग्य कि अयोग्य याची
सहज जाण देतात. म्हणून या जगात संस्कारांना
महत्व आहे कितीही मोठे झालो तरी जीवनाचा
पाया तेच भक्कम ठेवतात
भूतकाळाचा विचार करताना मी काय गमावले पेक्षा 
मला काय आणि कसे मिळाले किंवा मी काय आणि 
.कसे मिळवले याचा विचार करणे गरजेचे आहे
जे गमावले ते परत मिळेलही कदाचित किंवा मिळणारही 
नाही परंतु जे मी मिळवले किंवा मिळाले त्यात माझी 
भूमिका योग्य होती कि अयोग्य याचा विचार आधी
झाला पाहिजे. अशा प्रकारचे आत्मपरीक्षण आपल्याला
भविष्यातील अनेक घटनांमध्ये योग्य दिशा दाखवण्यास
मदत करते. किंबहुना आपल्यालाच आपल्या व्यक्तिमत्वाची
.नव्याने ओळख करून देते
आपण बर्याचदा आपल्या आस पास वावरणाऱ्या व्यक्तींना 
गृहीत धरत असतो आणि नकळत त्यांच्या कडून ठराविक 
गोष्टींची / प्रतिक्रियांची अपेक्षा करत असतो. परंतु काही वेळा 
आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा फारच वेगळे अनुभव येतात 
आणि आपण गोंधळून जातो, त्रास करून घेतो किंवा इतरांना
त्रास देतोही. खरे पाहता या गैरसमजाची सुरवात आपण आपल्या
पासूनच केलेली असते. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि काळानुरूप/अनुभावानुरूप त्याचे विचार आणि प्रतिक्रिया बदलू शकतात याचा विचार आपण कधीही केलेला नसतो. त्यामुळे सतत इतरांना गृहीत न धरता बदललेल्या परिस्थितीला सहजतेने स्वीकारून प्रसंगावधान ठेवायला शिकणे गरजेचे आहे
आपल आयुष्य ठराविक क्रमात जात असल तरी ते 
प्रत्येकाला स्वतंत्र जीवन जगण्याची संधी देत असतं .
या संधीचा योग्य वापर कसा करून घ्यावा किंबहुना 
अशा संधी मिळत असतात याच भानच कित्येकांना 
नसत. अशावेळी अनेक कारणे देऊन किंवा परिस्थितीला 
दोष देऊन आपण जीवनात काही गोष्टी का करू शकलो
नाही याचे स्पष्टीकरण दिले जाते. आपण जे काही करत
असतो त्यामागे आपली एक तीव्र भावना सतत काम करत असते.त्यामुळे आयुष्यातील इतर गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो.
कालांतराने या दुर्लक्षित गोष्टी महत्वाच्या वाटू लागतात
आणि करायच्या राहून गेल्या याचे शल्य वाटते. परंतु असे
न करता आयुष्यात स्वतः साठी योग्य गोष्टींची निवड करता आली तर बर्याच अंशी अशा शल्यातून होणारे दुखः कमी होईल